पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या चिथावणीनेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकत्रे संदीप राजोबा यांना पलूसच्या आमसभेत बेदम मारहाण झाली असून, कोणाचीही गय करणार नाही अशा डरकाळ्या फोडणारे गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्या पोलीस खात्याने बघ्याची भूमिका घेतली, असा आरोप खा. राजू शेट्टी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला. गृहमंत्र्यांनी राज्यात कायद्याचे राज्य आहे की, काय द्यायचे, याचा खुलासा करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
पलूस पंचायत समितीची ७ वर्षांनंतर आमसभा होत असल्याने संदीपने काही प्रश्न उपस्थित केले होते. मात्र पालकमंत्र्यांचे जावई, जिल्हापरिषद सदस्य, वाळू तस्कर, सावकारी करणारे आणि विनयभंग करणारे लोक लोकशाहीतील आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत होते. हे सर्व पालकमंत्र्यांच्या समोर चालले असताना त्यांना थोपविण्याऐवजी पालकमंत्र्यांनी, शेंबडय़ाला चार वर्षांपूर्वी मारायला हवे होते, असे वक्तव्य केले आहे.
पोलिसांनी घटनेबाबत गर्दी, मारामारीचा गुन्हा दाखल करून आरोपींना तत्काळ जामीन मिळेल अशी व्यवस्था केली. मात्र ज्यांना मारहाण झाली ते संदीप राजोबा आजही अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. सदर घटनेची चित्रफीत आमच्याकडे उपलब्ध आहे. मी तुरुंगात असताना आंदोलनस्थळी झालेल्या मारहाणीनंतर दीड वर्षांनी मृत्यू पावलेल्या पोलीस कर्मचाऱ्याबद्दल माझ्याविरुद्ध ३०२ अन्वये गुन्हा दाखल होऊ शकतो. मात्र पलूस आमसभेत झालेल्या प्रकाराबाबत पोलिसांनी दुटप्पी भूमिका आक्षेपार्ह आहे, असेही खा. राजू शेट्टी यांनी सांगितले.
चेहरा बघून कायद्याचा अर्थ बदलत असेल, तर सर्वसामान्यांचा व्यवस्थेवरील विश्वास उडेल, असे सांगून खा. शेट्टी म्हणाले की, या संदर्भात योग्यवेळी आपण भूमिका स्पष्ट करू. जनतेने निषेध व्यक्त करण्यासाठी बंद पाळू नये किंवा सामान्य माणसाच्या हिताला बाधा येईल असे कृत्य करू नये असे आवाहनही त्यांनी केले.

Story img Loader