तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे (बीआरएस) अध्यक्ष के. चंद्रशेखर राव हे त्यांच्या पक्षाचा महाराष्ट्रात विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून विविध राजकीय पक्षांमधील नाराज नेत्यांना बीआरएसने आपल्या पक्षात घेतलं आहे. तसेच अनेक नाराज नेत्यांना त्यांनी पक्षात येण्याची ऑफर दिली आहे. त्याचबरोबर राज्यातल्या शेतकरी नेत्यांनाही बीआरएसकडून ऑफर दिली गेली आहे. शेतकरी नेते आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनादेखील बीआरएसने पक्षात येण्याची तसेच मुख्यमंत्रीपदाची (बीआरएसचा राज्यातील मुख्यमंत्रीपदाचा चेहरा) ऑफर दिली आहे.
बीआरएसकडून आलेल्या ऑफरवर राजू शेट्टी यांनी प्रसारमाध्यमांशी सविस्तर बातचित केली. यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी राजू शेट्टींना थेट प्रश्न विचारला की, बीआरएसकडून तुम्हाला मुख्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात आली आहे का? यावर राजू शेट्टी म्हणाले, राज्यातल्या अनेक शेतकरी नेत्यांना बीआरएसकडून ऑफर मिळाली आहे. यामध्ये विजय जावंदे असतील, वामनराव चटप असतील यांच्यासह अनेक शेतकरी नेत्यांशी बीआरएसने संपर्क साधला आहे. त्यांनाही तशी ऑफर दिली होती. मलाही दिली होती.
राजू शेट्टी म्हणाले, मला त्यांच्याकडून सांगण्यात आलं की, आम्ही भारत राष्ट्र समितीकडून महाराष्ट्रात आगामी निवडणुका लढणार आहोत. तुम्ही जर आमच्या पक्षात आलात तर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून आम्ही तुमचा चेहरा पुढे करू. राज्यात शेतकऱ्यांचं राज्य असेल आणि त्यासाठी पक्षाचा चेहरा म्हणून तुम्ही असाल. तुम्ही आमच्या पक्षात प्रवेश करा. त्याचबरोबर आम्ही आमच्या पक्षाच्या केंद्रीय कोअर कमिटीत सदस्य म्हणून तुमचा समावेश करू, असा प्रस्ताव त्यांनी दिला होता. परंतु त्यांच्या प्रस्तावास मी नम्रपणे नकार दिला आहे.
हे ही वाचा >> प्रकाश आंबेडकरांनी औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहण्यावरून रामदास आठवले म्हणाले, “मुद्दाम काहीतरी खोड…”
राजू शेट्टी म्हणाले, मी त्यांना नम्रपणे सांगितलं की, कुठल्याही पक्षात जायचा विचार मी आतापर्यंत कधीच केला नाही. कधी कुठल्या पक्षात गेलो नाही. आतापर्यंत आम्ही आघाड्या केल्या आहेत. परंतु कुठल्या पक्षात जायचा विचारही कधी माझ्या आला नाही. राजकारणात मला जर अशा प्रकारे करीअर करून स्थिर व्हायचं असतं तर २० वर्षांपूर्वी जेव्हा निवडून आलो तेव्हाच मी तसा विचार केला असता. त्यामुळे त्यांच्या ऑफरला मी नम्रपणे नकार दिला.