राष्ट्रवादी हाच ‘स्वाभिमानी’चा मुख्य शत्रू – राजू शेट्टी
महायुतीच्या सरकारमध्ये घटकपक्ष असलेला स्वाभिमानी शेतकरी संघटना सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांना शह देण्यासाठी काँग्रेसबरोबर युती करणार असल्याचे सूतोवाच काँग्रेसचे नेते माजी मंत्री पतंगराव कदम यांनी केले. त्यामुळे राजकारणात खळबळ उडाली. लोकसभा व विधानसभेत सेना-भाजप युती आहे. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्था, सहकार, बाजार समित्या, दूध संघ यामध्ये मात्र युती नाही. स्थानिक पातळीवर त्यासंदर्भात धोरण घेतले जाईल, असे संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी ‘लोकसत्ता’ला दिलेल्या खास मुलाखतीत स्पष्ट केले.
जिल्हा परिषद निवडणुकीत स्वाभिमानी काँग्रेसबरोबर युती करणार असल्याचे माजी मंत्री कदम यांनी जाहीर केले. त्याबद्दलची तुमची भूमिका काय?
स्वाभिमानी महायुतीत आहे. पण जिल्हा परिषद किंवा अन्य स्थानिक निवडणुकांत राज्य पातळीवर नव्हे तर स्थानिक पातळीवरच निर्णय घेण्याचा निर्णय झाला. एकमेकांच्या स्थानिक संबंधाच्या धोरणाचा हा भाग आहे. सांगलीत जो निर्णय झाला त्याला अनेक पदर आहेत. पूर्वीपासून आम्ही राष्ट्रवादीविरुद्ध लढत आलो. राष्ट्रवादीतून भाजपत आलेल्यांची त्यांच्या पूर्वीच्या नेत्यांशी आजही राजकीय जवळीक आहे. त्या दृष्टीने ते निर्णय घेतात. त्यामुळे सरकार बदलले तरी सत्तेचा फायदा हा त्यांच्या छुप्या तडजोडीला मिळतो. बाजार समितीत माजी मंत्री कदम यांनी महायुती केल्याने सांगली बाजार समितीत राष्ट्रवादीचा पराभव झाला. कोल्हापूर जिल्हा परिषदेत काँग्रेस-स्वाभिमानी युती आहे. राज्यातही सोलापूर, पुणे, सातारा आदी भागांत राष्ट्रवादीची गुंडागर्दी व शेतकरीविरोधी भूमिकेविरुद्ध काँग्रेस-स्वाभिमानी यांच्यात एकवाक्यता आहे.
राज्यात सर्वत्र काँग्रेसबरोबर जाणार का?
प्रस्थापितांविरोधातील संघर्ष हा शेतकऱ्यांकरिता आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, विजयसिंह मोहिते, माजी मंत्री जयंत पाटील तसेच सहकारातील राष्ट्रवादीच्या साखर कारखानदारांविरुद्ध लढावे लागते. त्याला कधी कधी स्थानिक काँग्रेस नेत्यांची साथ मिळते. तळागाळात स्वाभिमानीचे काम आहे. राजकीय सुडापोटी कारवाई होऊनही लढाई चालू ठेवली. संघटना त्यामुळेच वाढली. आता सत्तेची ऊब मिळावी म्हणून राष्ट्रवादीतून भाजपात काही नेते आले. ही सूज आहे. पुढे ते पुन्हा राष्ट्रवादीत जातील. त्यामुळे त्यांच्या नादी न लागता स्थानिक पातळीवर निवडणूकीचे धोरण ठरले जाणार आहे. राज्यात सर्वत्र अशी भूमिका नाही. बारामतीत पवारांना विरोध तर, इंदापूर येथे हर्षवर्धन पाटलांना विरोध, जेथे ताकद आहे तेथे स्वतंत्र भूमिका असे ठरले आहे.
सेना-भाजपबरोबर युती का नाही?
सत्तेमुळे आता सेना-भाजपकडे तिकीट मागणाऱ्यांची संख्या वाढणे स्वाभाविक आहे. प्रत्येकाला पक्ष वाढवायचा आहे. आम्हालाही तो वाढवायचा आहे. जागांचे वाटप या निवडणुकीत राज्यपातळीवर करणे अवघड आहे. त्यापेक्षा मंद गतीने जाऊन संघटनेची फळी गावपातळीवर तयार करण्यासाठी आम्ही तडजोडी करत आहोत. दुसरी व तिसरी फळी ही कशी उभी करता येईल त्या रणनीतीला प्राधान्य आहे. त्यामुळे सेना-भाजपच्या युतीत निवडणुकीत फरपट होऊ द्यायची नाही.
राष्ट्रवादीलाच विरोध का?
भाजपने स्थानिक पातळीवर पक्ष वाढविण्यासाठी दुसऱ्या पक्षातले नेते घेतले. ते पुढे टिकणार नाहीत. त्यांचा ओढा पुन्हा घराकडे असतो. राष्ट्रवादीने साखर कारखाने, दूधसंघ, बाजार समित्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लुटले. या गुंडागर्दीविरुद्ध काँग्रेस लढली नाही. पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण या माजी मुख्यमंत्र्यांची त्यांना साथ मिळाली नाही. आम्ही लढलो, लाठय़ा-काठय़ा खाल्ल्या, चळवळी संपविण्यासाठी राष्ट्रवादीचे अजित पवार, जयंत पाटील यांच्यासह अनेक मंत्र्यांनी सत्तेचा वापर केला. त्या वेळी सहानुभूती व राजकारणातून काँग्रेसची भूमिका आम्हाला अनुकूल असे. राष्ट्रवादी आम्हाला शत्रू मानते. शेतकऱ्यांच्या हितासाठी लढतो म्हणून त्यांचा विरोध का? त्यांचे नेते दडपशाही करतात. त्यामुळे त्यांना विरोध करावा लागतो. आजही सहकारात त्यांचेच राज्य आहे. त्यांच्याशी लढूनच न्याय मिळवायचा आहे. त्यामुळेच त्यांना विरोध आहे.
मुंडे, जानकर या फॉम्र्युल्याबरोबर आमची आघाडी आहे. त्यांचा शेतकऱ्यांच्या प्रश्नांना पाठिंबा आहे. सहकारातील लूटमारीविरुद्ध साथ आहे. त्यामुळे त्यांच्याशीही स्थानिक पातळीवर युती करू. रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर यांच्याशी युती होऊ शकते. पण कार्यकर्त्यांच्या पातळीपर्यंत ती पोहोचली पाहिजे. नैसर्गिक मैत्रीवर आमचा जोर आहे.