संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांच्या आरोप-प्रत्यारोपांनी जोरदार राजकीय चर्चा सुरू करून दिली असताना राज्यातले मूळ प्रश्न मात्र दुर्लक्षित राहात आहेत का? अशी शंका आता उपस्थित केली जाऊ लागली आहे. संजय राऊत यांनी आधी शिवसेना भवनावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत किरीट सोमय्या आणि भाजपावर आरोप केले. त्यानंतर सोमय्या आणि नारायण राणेंनी राऊतांवर टीका केली. यासंदर्भात आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“सध्याची ही राजकीय धुळवड आहे. ही राजकीय धुळवड ही तर फक्त सुरुवात आहे. कारण केंद्र सरकार पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे. करोनाच्या काळात अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. अनेकांचे रोजगार, नोकऱ्या गेल्या आहेत. महागाई वाढली आहे. शेतकरी हैराण आहे. दुसरीकडे महाविकासआघाडीचा आनंद आहे. त्यामुळे ही धुळवड सुरू झाली, की जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होतं”, असं राजू शेट्टी म्हणाले आहेत.
“ईडी खरंच येडी झालीये का?”
दरम्यान, ईडीच्या कारवायांवर देखील राजू शेट्टी यांनी टीकास्त्र सोडलं. “ईडी, आयकर, सीबीआय या सगळ्या घटनात्मक संस्था आहेत. यांच्याबद्दल देशाच्या प्रत्येक नागरिकाच्या मनात आदर होता. पण आता या संस्था आणि त्यांचे अधिकारी राजकीय कार्यकर्ते असल्यासारखे वागतायत का? असा संशय वाटू लागला आहे. एकीकडे कोण कुणाच्या लग्नाला गेलं, मंडप, चमचा लिंबू याची चौकशी ईडी करत असेल, तर ईडी खरंच येडी झालीये की काय? असं वाटायला लागलं आहे. चौकशी करायची असेल तर विजय मल्ल्या, २२ हजार कोटींचा घोटाळा करणाऱ्या एबीएलची चौकशी करा, शेतकऱ्यांना फसवणाऱ्या पीकविमा कंपन्यांची चौकशी करा. पण त्यांच्याकडे जायला ईडी तयार नाही”, असं देखील राजू शेट्टी म्हणाले.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आधी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमय्या आणि भाजपावर गंभीर आरोप केले. उद्धव ठाकरे यांच्यावर सोमय्यांनी केलेले सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचं ते म्हणाले. तसेच, किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या लवकरच तुरुंगात जाणार असल्याचं देखील राऊत म्हणाले होते. त्यावर प्रत्युत्तर देताना किरीट सोमय्यांनी देखील राऊतांवर टीका करत आरोप केले. त्यानंतर आज देखील हे सत्र सुरूच राहिलं असून आधी नारायण राणेंनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन संजय राऊतांवर निशाणा साधल्यानंतर शिवसेनेकडून विनायक राऊत यांनी देखील राणेवर टीकास्त्र सोडलं.