Maharashtra Rajya Sabha Election 2022 Updates : राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज (शुक्रवार) मतदान झालं. या निवडणुकीसाठी राज्यात कमालीची चुरस निर्माण झाली. घोडेबाजाराच्या आरोपामुळे गाजलेल्या या निवडणुकीत भाजपा, शिवसेना की काँग्रेसचा उमेदवार ‘सातवा’ म्हणजे पराभूत होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात आहेत.
राज्यसभा निवडणुकीत नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना न्यायालयाने मतदानाला परवानगी नाकारल्याने सत्ताधारी महाविकास आघाडीच्या गोटात अस्वस्थता पसरली. त्यांना उच्च न्यायालयात दिलासा मिळावा, असे प्रयत्न झाले परंतु, आघाडीचे दोन मतांचे गणित बिघडले. हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षाची तीन मते मिळण्याची महाविकास आघाडीला अपेक्षा आहे. परंतु ठाकूर यांनी स्पष्ट भूमिका जाहीर न केल्यानं साशंकता आह़े. त्यामुळे या निवडणुकीत प्रत्येक मतासाठी चुरस पाहायला मिळाली. शुक्रवारी (१० जून) रात्री उशिरापर्यंत निकाल जाहीर झाला नाही.
Rajya Sabha Election 2022 Live Updates : राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदान होत आहे. महत्वाच्या घडामोडी तुम्ही इथे एका क्लिकवर पाहू शकता.
जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले, "नियमाप्रमाणे मी ज्या व्यक्तीला माझं मत दाखवायला हवं त्या माझ्या पक्षाच्या प्रतिनिधीला दाखवलं. ते मत मी त्यांना दाखवलं नाही, तर मला माझा पक्ष ६ वर्षांसाठी निलंबित करू शकतो आणि माझं राजकीय आयुष्य बरबाद होऊ शकतं. मी माझ्या पक्षाच्या प्रतिनिधीला मत दाखवलं आणि ती प्रक्रिया पूर्ण केली. मी समोरच्या गोटातूनही माहिती घेतली. त्यांनी व्हिडीओत मी काहीही चुकीचं केल्याचं दिसत नसल्याचं सांगितलं."
"मी मतदानात जी कृती केलीय त्यात मत बाद व्हावं असं काहीही झालेलं नाही. महाराष्ट्रासमोर आम्ही चुका केल्या असं जाऊ नये. सध्या काय घडतंय हे महाराष्ट्राला कळत आहे. जे काय सुरू आहे ते वेदनादायक आहे. आम्हीही २०-२५ वर्षांपासून आमदार आहोत. उगाच रडीचा डाव खेळला जात आहे," असं मत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलं.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, "माझ्या मतावर आक्षेपाच्या बातम्या आल्या म्हणून मी भूमिका मांडत आहे. मी मतदान केल्यानंतर माझ्या पक्षाच्या प्रतिनिधींना मतदान दाखवले. ही प्रक्रिया आहे. मी तेथे हसलो त्याला वेगळ कारण होतं. मी मतपत्रिका बंद केली आणि पत्रिका टाकून बाहेर निघून गेलो. गेटवर जाईपर्यंत आक्षेप घेण्यात आला नव्हता. त्यानंतर आक्षेप घेण्यात आला."
मतांवरील आक्षेपांवर निर्णय झाल्यानंतर मतमोजणी पुन्हा सुरू होणार, भाजपाने पराभवाच्या भीतीने आक्षेप घेतला, अस्लम शेख यांचा हल्लाबोल
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधीमंडळातील लांबलेल्या मतमोजणीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी कोणी व का थांबवली? असा सवाल संजय राऊत यांनी केला. तसेच आधी ईडीचा डाव फसला, त्यामुळे भाजपाने आता रडीचा डाव सुरू केल्याचा आरोपही केला. त्यांनी ट्वीट करत आपली भूमिका मांडली.
भाजपा आणि मविआने राज्यसभा निवडणुकील काही आमदारांच्या मतांवर आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यामुळे राज्यसभा मतमोजणी लांबली आहे.
विधानभवनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपा आमदरांची बैठक सुरू आहे. विधिमंडळ परिसराबाहेर कार्यकर्ते जमण्यास सुरुवात झाली आहे.
https://twitter.com/ANI/status/1535204783128461313
राज्यसभा निवडणुकीत महाराष्ट्र विधानसभेतील २८८ पैकी २८५ आमदारांकडून मतदान, पहिल्या प्राधान्याच्या मतांसाठी ४०.७२ चा कोटा
काँग्रेसकडून सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदानावर आक्षेप नोंदवण्यात आला आहे. मुनगंटीवारांनी मतपत्रिका हातात दिल्याने काँग्रसेचे आमदार अमर राजूकर यांनी आक्षेप नोंदवला आहे.
राज्यसभा निवडणुकीसाठी सकाळी ९ वाजेपासून मतदानास सुरुवात झाली असून, ४ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्यामुळे आता मतदानासाठी अवघा एक तास शिल्लक राहिलेला आहे.
राज्यसभेसाठी दुपारी २ वाजेपर्यंत २८१ आमदारांचं मतदान पूर्ण झालं आहे. सकाळी ९ वाजेपासून मतदानास सुरुवात झालेली आहे.
महाराष्ट्र विधानसभेत आज राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान घेतलं जात आहे. आतापर्यंत जवळपास २७८ आमदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. भाजपाकडून आक्षेप घेतल्यानंतर विधानसभेत काही वेळासाठी गोंधळ निर्माण झाल्याची माहिती देखील समोर येत आहे. दरम्यान भाजपा आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आम्हीच जिंकणार असा दावा केला जात आहे. दुसरीकडे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आजपासून भारतीय जनता पार्टी’ची उलटी गिनती सुरू झाल्याचं म्हटलं आहे. सविस्तर बातमी
सत्र न्यायालयाने एकदा मतदान करण्यास नकार दिलेला असताना पोलीस बंदोबस्तात मतदानासाठी नेण्याचा प्रश्न येतो कुठे? असा प्रश्न करून उच्च न्यायालयाच्या आणखी एका एकलपीठाने नवाब मलिक यांच्या मतदानाच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे नवाब मलिक यांच्या मतदानाची शक्यता धूसर दिसत आहे.
राज्यसभेच्या सहा जागेसाठी सकाळी ९ वाजेपासून मतदानास सुरुवात झाली असून, दीड वाजेपर्यंत २७८ आमदारांचे मतदान झाले आहे.
मंत्री यशोमती ठाकूर यांच्या मतदानावर भाजपाने नोंदवलेला आक्षेपावर यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पराभव दिसत असल्याने भाजपाकडून असा डाव खेळला जात असल्याचे म्हटले आहे.
मी स्वतः पियुष गोयल यांचा पोलिंग एजंट या नात्याने यशोमती ठाकूर आणि सुहास कांदे ( शिवसेना आमदार ) यांच्या मतदानाबद्द्ल आक्षेप घेताल आहे. मतदान करतांना प्रत्येक पक्षाच्या मतदाराने त्यांच्या निवडणूक प्रतिनिधीला एका अंतरावरुन मतपत्रिका दाखवायची असते, यशोमती ठाकूर आणि जितेंद्र आव्हाड यांनी मतपत्रिका एजंटच्या हातात दिली. याबाबात आक्षेप आम्ही नोंदवला. स्वतःच्या प्रतिनिधीला मतपत्रिका दाखवायची असते मात्र कांदे यांनी स्वतःच्या पक्षाबरोबर इतर पक्षाच्या निवडणूक प्रतिनिधीला दिसेल अशी मतपत्रिका दाखवली, या कृतीमुळे हे मत बाद होतं.व्हिडिओ शुटिंग झालेलं आहे, नियमांचा भंग झालेला आहे, ही ३ मतं बाद करण्यात यावी अशी आमची मागणी आहे. असं पराग अळवणी म्हणाले आहेत.
राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज सकाळी ९ वाजेपासून मतदानसा सुरुवात झाली आहे. सर्व पक्षाचे आमदार मतदानाचा हक्क बजावत असून, दुपारी साडेबारा वाजेपर्यंत २३८ आमदारांचं मतदान झालं आहे.
“महाविकास आघाडी सरकारमध्ये आज चारही जागेवर आमचे उमेदवार निवडून येतील. भाजपाकडून काही बातम्या पेरल्या जात आहेत की शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वितुष्ट आहे. त्यात कोणतंही तथ्य नाही. तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी नव्या जोमाने हे उमेदवार उभे केले आहेत. ते निवडून येतील. भाजपाच्या अध:पतनाला आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानमित्त सुरुवात झाली असं मी समजतो ”, असं मिटकरी जारी केलेल्या व्हिडीओ संदेशामध्ये म्हणाले आहेत.
राज्यसभेच्या निवडणुकीला सुरवात झाली असून सर्वपक्षीय आमदार मतदानासाठी विधानभवनात हजेरी लावत आहेत. माझं मत महाविकास आघाडीला देणार आहे. माझं संपूर्ण समाधान झालं त्यामुळे आम्ही महाविकास आघाडी सोबत आहोत अशी प्रतिक्रिया सपा आमदार अबू आझमी यांनी दिली.
चिंचवडेच भाजपा आमदार लक्ष्मण जगताप हे आजारी असल्याने मतदानाचा हक्क बजवाण्यासाठी रुग्णवाहिकेतून विधानभवनात दाखलक झाले आहेत.
हवेत उडणारं भाजपाचं विमान संध्याकाळी जमिनीवर येणार. भाजपा नेत्यांच्या वक्तव्यांकडे लक्ष देण्याची गरज नाही. आपण पराभूत होणार आहोत, हे त्यांना माहिती असल्याने ते आरोप करत आहेत. असं शिवसेना नेते भास्कर जाधव म्हणाले आहेत.
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड तसेच भाजपाच्या महिला आमदार विधानभवनात मतदानसाठी हजर झाल्या होत्या.
राज्यसभेच्या सहा जागांसाठी सकाळी ९ वाजेपासून मतदानास सुरुवात झाली असून, साडे अकरा वाजेपर्यंत १८० आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. आणखी चार तास मतदानाचा कालावधी शिल्लक आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानभवनात पोहचले आहे. या अगोदर शिवसेनेचे सर्व आमदार विधानभवनात दाखल झाले असून मतदानही सुरू आहे.
नवाब मलिकांना मतदानासाठी तूर्त परवानगी मिळालेली नाही. नव्या याचिकेसह थोड्याच वेळात पुन्हा सुनावणी होणार आहे. याचिकेत सुधारणा करून नव्याने याचिका दाखल करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वर्षा निवासस्थानावरून विधानभवनाकडे रवाना झाले आहे. दुसरीकडे शिवसेना आमदारांचे मतदान सुरू आहे
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे मतदानासाठी विधानभवनात दाखल झाले आहेत.
पहिल्या दीड तासांत ५० टक्के आमदारांचं मतदान पूर्ण झालं आहे. १४३ आमदारांना मतदानाचा हक्क बजावला आहे. भाजपाच्या ६० पेक्षा अधिक आमदारांनी मतदान केलं आहे. तर, काँग्रेसच्या २० आमदरांचं मतदान झालं आहे.
राज्यसभेच्या निवडणूकीत महाविकास आघाडीचे चारही उमेदवार विजयी होतील, असा विश्वास शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला. तसेच महाविकास आघाडीत कोणतीही नाराजी नाही. विरोधी पक्षाकडून चूकीच्या बातम्या पसरवल्या जात असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.
भाजपाचे मुंगेरीलालचे स्वप्न पूर्ण होणार नाही. महाविकासआघाडीचे चारही उमेदवारांचा विजय होणार. आमच्या आमदारांपैकी कोणीही नाराज नाहीत. १०१ टक्के आमचाच विजय होणार. असं शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी बोलून दाखवलं आहे.
राज्यसभा निवडणुकीच्या मतदाना संदर्भातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी पाहा एका क्लिकवर