राज्यसभा निवडणुकीतील भाजपाचे उमेदवार अनिल बोंडे यांनी १०० टक्के विजयी होऊ असा विश्वास व्यक्त केला आहे. १०० टक्के आत्मविश्वास आहे, आमच्या मनात अजिबात धाकधूक नाही असं अनिल बोंडे यांनी विधीमंडळ परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. महाभारतात ज्याप्रमाणे अश्वत्थामा गेला तसं या निवडणुकीत कोणीतरी संजय जाणार हे नक्की आहे असंही विधान यावेळी त्यांनी केलं.
अनिल बोंडे यांना यावेळी संजय राऊत जाणार का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “कोणता अश्वत्थामा गेला होता हेदेखील धर्मराजाने सांगितलं नव्हतं. त्यामुळे कोणता संजय जाणार हे मी सांगणार नाही, ते नंतर कळेल”.
महाविकास आघाडीतील एक कोणता तरी संजय जाणार आहे. ५.३० वाजता कोणता ते कळेल असं सूचक विधान त्यांनी केलं. संध्याकाळी कोणत्या संजयला समजवण्यासाठी जातील ते पाहूयात असा टोलाही त्यांनी लगावला. तसंच भाजपाचे तिन्ही उमेदवार १०० टक्के विजयी होणार. कारण देवेंद्र फडणवीसांचा धाक आहे असंही त्यांनी सांगितलं.
शिवसेनेकडून राज्यसभेसाठी संजय राऊत आणि संजय पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे अनिल बोंडे यांचा रोख नेमका कोणाकडे होता याची चर्चा सुरु आहे.
खुल्या पद्धतीने मतदान
राज्यसभेसाठी खुल्या पद्धतीने मतदान होते. त्यानुसार राजकीय पक्षांच्या आमदारांना आपल्या पक्षाच्या प्रतोदाला दाखवून मतदान करावे लागते. आमदाराने पक्षादेश धुडकावल्यास त्या आमदाराच्या विरोधात पक्षाला पक्षांतरबंदी कायद्याखाली कारवाई करता येते. अपक्षांना मात्र मतपत्रिका दाखविण्याचे बंधन नसते. राज्यसभा निवडणुकीत आमदारांची मते बाद होण्याचे अनेक प्रकार घडले आहेत. हरयाणामध्ये काँग्रेसच्या १४ आमदारांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या पेनाऐवजी वेगळय़ा शाईच्या पेनाचा वापर केल्याने ही मते बाद ठरली होती. गुजरातमध्ये काँग्रेसच्या दोन आमदारांनी मते भाजपच्या नेत्यांना दाखविल्याने ती मते बाद ठरली होती. या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी मतदान कसे करायचे याचे प्रशिक्षण आपापल्या आमदारांना दिले आहे.
उमेदवार : प्रफुल्ल पटेल (राष्ट्रवादी), संजय राऊत (शिवसेना), पीयूष गोयल (भाजप), इम्रान प्रतापगढी (काँग्रेस), अनिल बोंडे (भाजप), संजय पवार (शिवसेना), धनंजय महाडिक (भाजप)
आमदारांचे संख्याबळ
१०६ भाजप
५५ शिवसेना</p>
५३ राष्ट्रवादी
४४ काँग्रेस</p>
अपक्ष व छोटे पक्ष २९