राज्यसभा निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय घडामोडींना कमालीचा वेग आलाय. संभाजीराजे छत्रपती यांनी महाराष्ट्रातून राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी अपक्ष उमेदवारी करण्याची घोषणा केली. तसेच अपक्ष आमदारांसह सर्व पक्षीय आमदारांना पाठिंब्याचं आवाहन केलं. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली. मात्र, अद्याप त्यांना अपेक्षित पाठिंबा मिळालेला नाही. शिवसेनेने पाठिंबा देण्यासाठी संभाजीराजेंसमोर शिवसेनेत प्रवेश करण्याची ऑफर दिल्याचीही जोरदार चर्चा होती. मात्र, संभाजीराजे मुंबई सोडून कोल्हापूरमध्ये गेल्याने या चर्चाही मावळल्या. आता शिवसेनेकडून राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी ४ नेत्यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.

महाविकासआघाडीतील घटक पक्ष शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने संख्याबळाचा विचार करता सहाव्या जागेच्या वाटपाचा फॉर्म्युला निश्चित केलाय. या प्रमाणे तिन्ही पक्षांना प्रत्येकी एका राज्यसभेच्या जागेसाठी ४२ आमदारांच्या मतांची गरज पूर्ण होऊन एक अतिरिक्त जागा लढवण्याचं संख्याबळ शिल्लक राहतं. त्यामुळे ही अतिरिक्त एक जागा आधी राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आली.

मागील राज्यसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून शरद पवार स्वतः आणि फौजिया खान हे दोघे राज्यसभेवर निवडून गेले. यावेळी या निवडणुकीत ही संधी शिवसेनेकडे देण्यात आलीय. त्यामुळे सहाव्य जागेसाठी कोणाला उमेदवारी द्यायची हा निर्णय घेण्याचा अधिकार शिवसेनेकडे आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केलीय.

आता शिवसेनेकडून या जागेवर उमेदवारी देताना पक्षवाढीचाही विचार होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजे छत्रपती यांना शिवसेनेत प्रवेश करण्यासोबत राज्यसभेत पाठिंब्याची ऑफर दिली. मात्र, संभाजीराजे अपक्ष उमेदवारीवर ठाम आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने राजकीय खेळी केल्याची चर्चा आहे. यानुसार संभाजीराजेंच्या ऐवजी शिवसेनेकडून ४ नेत्यांचा विचार केला जाऊ शकतो.

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून कोणाचा विचार होऊ शकतो?

१. संजय पवार (शिवसेना कोल्हापूर जिल्हाध्यक्ष)
२. चंद्रकांत खैरे (माजी खासदार, औरंगाबाद)
३. शिवाजीराव आढळराव पाटील (माजी खासदार, शिरूर)
४. उर्मिला मातोंडकर (शिवसेना नेत्या)

संभाजीराजेंनी ऑफर नाकारत कोल्हापूरला गेल्याची चर्चा सुरू असतानाच शिवसेनेकडून त्याच कोल्हापुरातून शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय पवार यांना राज्यसभा उमेदवारी देण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. संजय पवार सध्या शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांची ओळख एकनिष्ठ शिवसैनिक अशी आहे. सर्वांशी दांडगा संपर्क हे त्यांचं वैशिष्ट्य सांगितलं जातं. त्यामुळे शिवसेनेकडून पक्षनिष्ठ संजय पवार यांना संधी देऊन शिवसैनिकांमध्ये संदेश देण्याचा प्रयत्न करू शकते.

याशिवाय शिवसेनेचे औरंगाबादमधील माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या राजकीय पुनर्वसनाचीही शक्यता आहे. दोघेही शिवसेनेचे जुने आणि ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे यापैकी एकाला राज्यसभेवर संधी देण्याचा निर्णय शिवसेना घेऊ शकते.

हेही वाचा : संभाजीराजेंनी शिवसेनेची ऑफर नाकारल्याची चर्चा, नाना पटोलेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाले…

राज्यसभेसाठी आणखी एका नावाची चर्चा आहे ते नाव म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर. उर्मिला मातोंडकर यांनी अभिनयाच्या क्षेत्रातून राजकीय क्षेत्रात पदार्पण केलंय. त्यांचं नाव राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये असल्याचीही चर्चा आहे. मात्र, मागील दोन वर्षांपासून राज्यपालांनी आघाडी सरकारने पाठवलेल्या यादीवर निर्णय न घेतल्याने हा निर्णय कधी होणार याविषयी शंका व्यक्त होत आहे. अशात उर्मिला मातोंडकरांना राज्यसभेवर पाठवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राज्यसभा निवडणुकीत पक्षनिहाय संख्याबळ काय?

महाराष्ट्रातून राज्यसभेच्या सहा जागांसाठी १० जूनला निवडणूक होत आहे. विधानसभा सदस्यांमधून राज्यसभेवर उमेदवार निवडून द्यायचे आहेत. निवडून येण्यासाठी ४१.०१ मते मिळणे आवश्यक आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार १०६ आमदार असलेल्या भाजपचे दोन उमेदवार सहज निवडून येऊ शकतात व त्यांची काही मते शिल्लक राहतात. शिवसेनेचे ५५ आमदार आहेत, त्यांचा एक उमेदवार निवडून येतो व १३ मते अतिरिक्त ठरतात.

राष्ट्रवादी काँग्रेसकडे ५३ मते आहेत, त्यांचाही एक उमेदवार निवडून येतो व १२ मते शिल्लक राहतात. काँग्रेसचे ४४ आमदार आहेत. त्यांनाही एक जागा मिळते व ३ मते शिल्लक राहतात. कोणत्याही एका पक्षाच्या अतिरिक्त मतांवर सहावा उमेदवार निवडून येऊ शकत नाही. सहाव्या जागेबाबत भाजपने अजून आपले पत्ते उघड केलेले नाहीत. परंतु शिवसेनेने सहावी जागा लढविणार अशी घोषणा केली आहे. मात्र मतांचे गणित कसे जमविणार, याबाबत अद्याप त्यांचे आडाखे समोर आलेले नाहीत.