राज्यात राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण गरम झालेलं आहे. सहाव्या जागेवरून भाजपा आणि शिवसेनेत थेट लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण, आज निवडणूक अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी दोन्ही पक्षांनी आपले उमेदवार कायम ठेवले आहेत. विशेष म्हणजे आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रत्यक्ष घरी भेट घेत, निवडणूक बिनविरोध करण्यासाठी चर्चा देखील केली होती, मात्र ही चर्चा यशस्वी झाली नाही. त्यामुळे आता राज्यात राज्यसभेची निवडणूक अटळ आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संजय राऊत म्हणाले, “वेळ संपलेली आहे असं म्हणण्यापेक्षा आता वेळ सुरु झालेली आहे. आता स्पष्ट चित्र झालं आहे. महाविकास आघाडीकडून प्रयत्न झाले की, महाराष्ट्रात शक्यतो राज्यसभेची निवडणूक आपण एकमेकांच्या सहमतीने लढवतो. कोणत्याही प्रकारे घोडेबाजाराला वाव राहू नये, यासाठी नेहमीच आम्ही अशा निवडणुकांमध्ये प्रयत्न केलेले आहेत. त्या दृष्टीने महाविकास आघाडीचे नेते हे आज सकाळी भाजपाच्या प्रमुख नेत्यांना त्यांच्या घरी जाऊन भेटले. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांना त्यांच्या घरी जाऊन भेटले आणि चर्चा केली. काही प्रस्तावांचं अदानप्रदान झालं. मला असं वाटतं की, पुढील तीन-चार तासांमध्ये त्या संदर्भात काही विशेष घडलं नाही. दोन्ही बाजू आपल्या भूमिकांवर ठाम आहेत.”

महाविकास आघाडीला पूर्ण खात्री आहे की…

तसेच, “भाजपा त्यांचा उमेदवार मागे घेण्याच्या मनस्थितीत नाही आणि शिवेसेनेचे जे दुसरे उमेदवार आहेत, संजय पवार हे देखील रिंगणात आहेत. त्यामुळे आता जी काय निवडणुकीची प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेला सामोरं जाणं आणि महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून आणणं, ही आमची जबाबदारी आहे. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालची जी महाविकास आघाडी आहे, या महाविकास आघाडीला पूर्ण खात्री आहे की आमचा सहावा उमेदवार देखील अगदी व्यवस्थित निवडून येईल.” असं देखील यावेळी संजय राऊत यांनी बोलून दाखवलं.

जसं केंद्रात तुमचं सरकार आहे, तसं महाराष्ट्रात आमचं सरकार

याचबरोबर “प्रश्न कसोटीचा नाहीए ही निवडणूक आहे. जर सामोपचाराने काही मार्ग निघाला असता तर, हे दोघांनाही हवं होतं. पण नाही झालं. त्यामुळे ही निवडणूक आम्ही जिंकू. कारण ज्या अर्थी आम्ही आमचा उमेदवार रिंगणात कायम ठेवला आहे, संजय पवार यांना त्या अर्थी आमची पूर्ण तयारी आहे. असं नाही की आम्ही निवडणुकीला घाबरतोय, सरकार आहे महाराष्ट्रात लक्षात घ्या. जसं केंद्रात तुमचं सरकार आहे, तसं महाराष्ट्रात आमचं सरकार आहे. आमदरांचा आणि मुख्यमंत्र्यांचा आणि आमच्या सगळ्यांचा उत्तम समन्वय आहे. मूळात राजकीय पक्षाच्या आमदारांना मत हे दाखवायचं असतं. त्यामळे तो प्रश्न येत नाही, बाकीची लढाई आहे ती अपक्ष आणि इतर छोटे पक्ष यांच्यासाठी आहे. परंतु गेल्या अडीच वर्षांत मुख्यमंत्र्यांनी सरकारने या सगळ्यांशी उत्तम संवाद ठेवून, अनेकांच्या मतदार संघातील महत्वाची कामे केल्यामुळे हे सर्व आमदार महाविकास आघाडीबरोबर जोडलेले आहेत. आता यांना फूस लावण्याचे, फोडण्याचे आमिषं दाखवण्याचे किंवा केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करण्याचे प्रकार सुरू झाल्याचं आमच्या कानावर आलेलं आहे. पण ठीक आहे हे त्यांची पद्धत आहे राजकारण करण्याची, त्या पद्धतीने ते करत असतील. तरी आमची काही हरकत नाही. आम्ही आमचं काम करत राहू.” असंही यावेळी संजय राऊत यांनी बोलून दाखवलं.

Rajyasabha Election : विरोधी पक्षाने आमच्यावर ही निवडणूक लादली आहे, मात्र त्यांना पश्चाताप होणार – संजय राऊत

आज दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत होती. मात्र, तोपर्यंत दोन्ही बाजूंनी प्रस्ताव स्वीकारल्याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे आता राज्यसभा निवडणूक होणार असल्याचं निश्चित झालं आहे.