राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं दिसत आहे. या निमित्त पुन्हा एकदा सत्ताधारी महाविकासआघाडी आणि भाजपा नेत्यांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. भाजपाने केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल, माजी कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे आणि कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तसेच, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधत, तीन पैकी एक उमेदवार मागे घेतला तर घोडेबाजार होणार नसल्याचं म्हटलं आहे. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं आहे.

संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले, “लोकशाही आहे ज्याला आपण संसदीय लोकशाही म्हणतो ती आहे. त्यामुळे अशाप्रकारे जर कोणाला निवडणुका लढायच्या असतील तर लढू शकतात, फक्त एक लक्षात घेतलं पाहिजे घोडेबाजार करण्याचा कोणी प्रयत्न करू नये. जसं तुमचं लक्ष असतं केंद्राकडून तसं महाराष्ट्रात सुद्धा लक्ष आहे, आमच्या गृह खात्याचं आणि मुख्यमंत्र्यांचं. निवडणूक झाली तर स्वागत आहे, नाही झाली तर डबल स्वागत आहे.”

पीयूष गोयल हे बराच काळ दिल्लीला असतात त्यामुळे –

तसेच, “उत्तर देण्यासाठी ही निवडणूक आहे का? ठीक आहे पाहू. पीयूष गोयल हे महाराष्ट्राचे प्रतिनिधी आहेत. त्यांना महाराष्ट्राविषयी जपून भूमिका घ्यावी. महाराष्ट्रात विश्वासघाताची परंपरा नाही. या महाराष्ट्रात ती कोणी सुरु केली २०१४ आणि २०१९ मध्ये हे या राज्याची जनता जाणते. बहुतेक पीयूष गोयल हे बराच काळ दिल्लीला असतात त्यामुळे त्यांना इकडच्या घडामोडी फार माहीत नसतात.” असंही संजय राऊतांनी यावेळी बोलून दाखवलं.

याचबरोबर, “संसदीय लोकशाहीत अशाप्रकारे उमेदवारी अर्ज दाखल होत असतात. जर त्यांना वाटत असेल की त्यांच्याकडे ते संख्याबळ आहे, तर निश्चितच त्यांना अधिकार आहे. आम्हाला वाटतं की,आम्ही जिंकू. महाविकास आघाडीकडे जिंकण्यासाठी जेवढी मतं आवश्यक आहेत, ती आमच्याकडे आहेत. संपूर्ण गणित झालं आहे.मात्र या निवडणुकीत जर कोणी समजत असेल की ईडी, सीबीआय आणि आयकर विभाग देखील मतदान करू शकतात, तर मला माहीत नाही. मात्र इथले जे आमदार आहेत, मग ते अपक्ष किंवा लहान पक्षांचे असतील ते सर्वजण आमच्यासोबत आहेत, आमच्यकाडे संपूर्ण संख्याबळ आहे.” असंही यावेळी संजय राऊत यांनी सांगितलं.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले आहेत? –

“आम्हाला घोडे बाजार करायचा नाही. आमचे तिन्ही उमेदवार निवडून येणार आहेत. त्यांनी निर्णय घेतला पाहिजे. त्यांनी तीन पैकी एक उमेदवार मागे घेतला पाहिजे तर घोडेबाजार होणार नाही. जरी त्यांनी उमेदवार कायम ठेवला आम्ही कुठलाही घोडेबाजार करणार नाही. आमचे तिन्ही उमेदवार महाराष्ट्रातील आहेत. सदसदविवेक बुध्दीने काही लोक आम्हाला मतदान करणार आहेत. जे लोक दिल्लीत बसलेले आहेत, ते महाराष्ट्रासोबत नेहमीच बदल्याच्या भावनेने काम करतात. पीयूष गोयलेने केलेलं विधान आमच्या सर्व आमदारांनी आणि राज्याच्या जनेतेने लक्षपूर्वक ऐकलं आहे.”

“त्यांनी एक उमेदवार मागे घेतला तर…”; राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार होण्यावरुन देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

“भाजपातर्फे तीन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. केंद्रीय मंत्री पियुष गोयल पुन्हा एकदा महाराष्ट्रातून निवडून राज्यसभेवर जात आहेत याचा आम्हाला आनंद आहे. त्यासोबत अनिल बोंडे यांचा कृषीविषयक अभ्यास आहे. धनंजय महाडिक यांचे सहकार क्षेत्रात मोठे काम आहे. या तिन्ही उमेदवारांचे अर्ज आम्ही भरले आहेत. मला विश्वास आहे की आमचे तिन्ही उमेदवार निवडून येतील.” असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Story img Loader