महाराष्ट्र विधानसभेत आज राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान घेतलं जात आहे. आतापर्यंत जवळपास २७८ आमदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. भाजपाकडून आक्षेप घेतल्यानंतर विधानसभेत काही वेळासाठी गोंधळ निर्माण झाल्याची माहिती देखील समोर येत आहे. दरम्यान भाजपा आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आम्हीच जिंकणार असा दावा केला जात आहे. दुसरीकडे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आजपासून भारतीय जनता पार्टी’ची उलटी गिनती सुरू झाल्याचं म्हटलं आहे.

एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना त्यांनी म्हटलं की, “भारतीय जनता पार्टीने देशात जी कटुता निर्माण केली आहे. त्याचे परिणाम आजपासून पाहायला मिळणार आहेत. आजपासून भारतीय जनता पार्टीची उलटी गिनती सुरू होणार आहे.” राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून येतील असा विश्वासही यावेळी त्यांनी बोलून दाखवला आहे.

दुसरीकडे, राज्यसभा निवडणुकीत आपल्याला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी कोर्टात अर्ज दाखल केला होता. पण मतदान करण्यासाठी एक दिवसाचा जामीन देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. तसेच पुन्हा नव्याने अर्ज करण्याच्या सूचना देखील न्यायालयाने दिल्या आहेत. यावर आज दुपारी सुनावणी होणार आहे. विशेष म्हणजे यापूर्वीच ईडीने अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना जामीन देण्याला विरोध केला होता.

याबाबत विचारलं असता नाना पटोले म्हणाले की, “भारतीय जनता पार्टीने कितीही सत्तेचा दुरुपयोग केला तरी त्याचा फायदा होणार नाही. शेवटी लोकांचाच विजय होणार आहे”, असंही नाना पटोले यावेळी म्हणाले. राहुल गांधी यांना जारी केलेल्या ईडी नोटीसीबाबत बोलताना त्यांनी सांगितलं की, “आमचे नेते राहुल गांधी यांना १३ जून रोजी ईडीने दिल्लीतील कार्यालयात चौकशीसाठी बोलावलं आहे. महाराष्ट्रात मुंबई आणि नागपूर याठिकाणी ईडीची कार्यालये आहेत. याठिकाणी मोठ्या प्रमाणात जमाव गोळा केला जाईल, वेळ पडली तर ‘जेल भरो’ देखील केलं जाईल.”