“शिवसेनेचे गर्वाचे घर खाली. वाचाळवीर संजय राऊत आता कसं वाटतंय गार गार वाटतंय”, अशा शब्दात माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या समर्थकांनी राज्यसभा निवडणुकीच्या निकालावरून शिवसेनेला टीकेचे लक्ष्य केले आहे. “पक्षाच्या नावात शिव वापरुन रॉयल्टी खाल्लीत, आता शिवसेनेला शिवाजी महाराजांच्या नावाची रॉयल्टी खाऊ देणार नाही”, असा इशारा छावा प्रमुख धनंजय जाधव यांनी समाज माध्यमातून व्यक्त केले आहे.
राज्यसभा निवडणुकीमध्ये कोल्हापुरातील धनंजय महाडिक यांचा विजय झाला असून शिवसेनेचे संजय पवार पराभूत झाले आहेत.
निकालाचा हा संदर्भ घेऊन संभाजी राजे समर्थक छावा प्रमुख धनंजय जाधव यांनी ट्विटर वर यावर प्रतिक्रिया नोंदवली आहे.
त्यात म्हटले आहे की, “शिवसेनेचे गर्वाचे घर खाली. संजय राऊत आता कसं वाटतयं… गार गार वाटतयं. संभाजीराजेंना शिवबंधन बांधायला सांगणारे मागील ३० वर्षांपासून शिवबंधन बांधलेल्या कार्यकर्त्याला निवडून आणू शकलेले नाहीत. छत्रपती संभाजीराजेंना शिवसेनेने बिनशर्त खासदार करावं अशी अनेक आमदारांची सुप्त इच्छा होती. परंतु शिवसेनेने शब्द फिरवल्याने आणि नाहक अटी, शर्ती घातल्याने ते शक्य झाले नाही. पण छत्रपती घराण्याचा अपमान सहन न झालेल्या आमदारांनी शिवसेना, वाचाळवीर संजय राऊत आणि महाविकासघाडीच्या नेत्यांना त्यांची जागा दाखवून दिली.
संभाजीराजेंना जर अपक्ष परंतु पुरस्कृत उमेदवारी दिली असती तर शिवसेनेवर आज ही वेळ आली नसती”.
“पक्षाच्या नावात “शिव” वापरुन रॉयल्टी खाललीत. आता शिवसेनेला शिवाजी महाराजांच्या नावाची रॉयल्टी खाऊन देनार नाही”, असे छावाप्रमुख धनंजय जाधव ( संभाजीराजे समर्थक ) यांनी नमूद केले आहे.