Raksha Khadse रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणी अनिकेत भोईला पोलिसांनी अटक केली आहे. रक्षा खडसेंच्या अल्पवयीन मुलीची आणि तिच्या मैत्रिणींची त्याने छेड काढली होती. त्या प्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. महाशिवरात्रीच्या यात्रेत रक्षा खडसे यांची मुलगी गेली होती. त्यावेळी ही घटना घडली आहे.
नेमकं काय प्रकरण आहे?
मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावात महाशिवरात्री निमित्त आदिशक्ती मुक्ताबाईची यात्रा भरते. या यात्रेनिमित्त कोथळी विविध कार्यक्रम पार पडतात. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांची कन्या या यात्रेत फराळ वाटप करत होती. यावेळी भोई नावाचा तरुण तिचा पाठलाग करत होता. त्यानंतर रक्षा खडसे यांची कन्या यात्रेमध्ये सायंकाळच्या वेळेस मैत्रिणीबरोबर फिरायला गेली असता भोई नावाच्या तरुणासह काही टवाळखोरांनी तिचा पाठलाग केला. ती ज्या पाळण्यामध्ये बसत होती, त्या पाळण्यामध्ये सुद्धा तरुण बसला. त्यानंतर काही व्हिडिओ चित्रित केले. ही बाब सुरक्षा रक्षकाच्या लक्षात येताच त्यांनी त्याला मज्जाव केला. परंतु टवाळखोरांनी सुरक्षारक्षकाशी झटापट केली. यानंतर टवाळखोर तरुणांना तातडीने अटक करण्याच्या मागणीसाठी रक्षा खडसे चांगल्याच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळालं.
इतर आरोपींचा शोध सुरु
टवाळखोर व छेडछाड करूनही तरुण मोकाट असल्याने रक्षा खडसे यांनी पोलिसांना जाब विचारला. यानंतर मुक्ताईनगर पोलिसांनी अनिकेत भोई,पीयूष मोरे, सोम माळी,अनुज पाटील किरण माळी या पाच जणांच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अनिकेत भोई याला पोलिसांनी अटक केली आहे. इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
एकनाथ खडसे यांनी नेमकं काय म्हटलं आहे?
“राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राज्यभरात अशा घटना वारंवार घडत आहेत. मुली पोलीस ठाण्यात जाण्यासाठी घाबरतात. मुलींची सुरक्षा ही बाब अवघड आहे. मी माझ्या नातीला सांगितलं की तू स्वतः जाऊन तक्रार कर. आपण कुणालाही घाबरता कामा नये.” असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.
गुंडाना स्थानिक नेत्यांचं संरक्षण-खडसे
छेडछाडीच्या या प्रकरणाबाबत रक्षा खडसे यादेखील पोलिसांशी बोलल्या आहेत.मी स्वतः पोलिसांशी बोललो आहे. हे लोक गुंड आहेत. त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. पोरींचे त्यांनी व्हिडिओ रेकॉर्डिंग केले. त्याचवेळी पोलिसांनी त्याला अडवलं होतं. पण त्यांनी पोलिसांना देखील मारहाण केली. पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पण ते जामिनावर सुटले. त्यांची इतकी हिंमत होते की ते पोलिसांना देखील मारहाण करातात. इतके गुंड याठिकाणी पसरलेले आहेत आणि इथे त्यांना स्थानिक लोकप्रतिनिधीचे संरक्षण आहे, असा आरोप एकनाथ खडसेंनी केला आहे.