लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाची दुसरी यादी बुधवारी जाहीर झाली. या यादीत महाराष्ट्रातली २० नावं आहेत. एकनाथ खडसेंच्या सुनबाई रक्षा खडसे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे रावेरमधील भाजपाचे अध्यक्ष अमोल जावळे नाराज झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यावर आता रक्षा खडसेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाल्या रक्षा खडसे?
“मी आज सकाळीच अमोल जावळे यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे, अमोल जावळे यांनी माझ्याशी बोलताना सांगितले की आमची कुठलीही नाराजी नाही पक्ष संघटनेने जो आदेश दिलेला आहे तो आम्हाला मान्य आहे. आम्ही पक्षासाठी एक निष्ठेने काम करू, ते आज रावेर लोकसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे जोखमीचे पद आहे ते हे सीट निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतील असं मला वाटतं, अमोल जावळे हे निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सक्रिय होतील, पक्षाने जो आदेश दिलेला आहे तो आदेश पदाधिकारी सुद्धा पाळणार आहेत असं पदाधिकाऱ्यांनी सुद्धा सांगितलं आहे” अशी प्रतिक्रिया खासदार रक्षा खडसे यांनी माध्यमांशी बोलताना मुक्ताईनगर येथे दिली आहे.
शरद पवार, एकनाथ खडसे, रोहिणी खडसे यांच्यात बंद दाराआड चर्चा
भाजपाच्या दुसऱ्या यादीत रावेर लोकसभा मतदारसंघातून रक्षा खडसेंना तिकिट देण्यात आलं आहे. त्या अनुषंगाने शरद पवार, एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. महाविकास आघाडीने आम्ही ३५ जागा जिंकणार असा दावा केला आहे. रावेर हा एकनाथ खडसेंचा बालेकिल्ला मानला जातो. त्या अनुषंगाने भाजपाने एकनाथ खडसेंच्या सुनेला म्हणजेच रक्षा खडसेंना तिकिट दिलं आहे. एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या रोहिणी खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. तर त्यांची सून म्हणजेच रक्षा खडसे भाजपात आहेत. रक्षा खडसे २०१९ लाही चांगल्या मतांनी निवडून आल्या होत्या. आता त्यांच्याविरोधात कुठला उमेदवार द्यायचा? त्याचा प्रचार एकनाथ खडसे करणार का? या सगळ्यावर चर्चा झाली असण्याची शक्यता आहे. बंद दाराआड झालेल्या चर्चेचा तपशील समजू शकलेला नाही.