जवखेडा दलित हत्याकांडाची सीबीआय चौकशी व्हावी, तसेच आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी दलित संघटनांनी पुकारलेल्या परभणी ‘बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. परभणी शहरातील बाजारपेठ, शाळा, महाविद्यालय, नवा मोंढा कडकडीत बंद होता. काही काळ ऑटो रिक्षा व बससेवाही बंद होती. दलित संघटनांच्या निषेध मोर्चात काही ठिकाणी दगडफेकीचे किरकोळ प्रकार घडले. काही युवकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येताना काही वाहनांची तोडफोड, तर काही ठिकाणी दगडफेक केली. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी व्यापाऱ्यांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. युवकांच्या हुल्लडबाजीमुळे शांततेत जाणाऱ्या मोर्चाला गालबोट लागले.
मोर्चात हजारो दलित बांधव, भगिनी सहभागी झाल्या होत्या. जवखेडा गावाला दिलेला तंटामुक्तीचा पुरस्कार रद्द करून आरोपींना तत्काळ अटक करावी, अन्यथा राज्यात आंबेडकरी जनतेचा उद्रेक होईल, असा इशाराही देण्यात आला. जवखेडा येथील तीन दलितांची क्रूरपणे हत्या होऊन २० दिवस उलटले. अजूनही पोलिसांना मारेकऱ्यांचा शोध लागत नाही. त्यामुळे सर्व दलित संघटना आक्रमक झाल्या असून त्यांनी ४ दिवसांपूर्वी परभणी ‘बंद’ पाळण्याचा निर्णय घेतला होता. ‘बंद’ ला विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांनीही पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे सकाळपासूनच दुकाने उघडली नाहीत. शिवाजी चौक, सुभाष रोड, गांधी पार्क, कच्छीबाजार, स्टेडियम, वसमत रस्ता, जिंतूर रस्ता आदी प्रमुख भागातील दुकाने दिवसभर बंद होती. रिक्षाही धावल्या नाहीत. एस. टी. नेही काही तास बससेवा बंद ठेवली. रिक्षा बंद असल्याने शाळा-महाविद्यालयातील मुले आली नाहीत. नवा मोंढय़ासह शहरातील पेट्रोल पंप बंद होते. अत्यावश्यक सेवा वगळल्याने तुरळक ठिकाणी औषधी दुकाने चालू होती. परंतु इतर सर्व व्यवहार शंभर टक्के बंद होते.
विजय वाकोडे व सिद्धार्थ हत्तीअंबीरे यांच्या नेतृत्वाखाली शनिवार बाजारमधून निघालेल्या मोर्चात जिल्हाभरातून दलित समाज मोठय़ा संख्येने सहभागी झाला होता. शिवाजी चौक, गुजरी बाजार, गांधी पार्क, स्टेशन रस्ता माग्रे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंबेडकर पुतळ्याजवळ आला. वाकोडे, हत्तीअंबीरे, गौतम मुंढे, भन्ते मुदीतानंद, रणजित मकरंद आदींची भाषणे झाली. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर जवळपास तास-दीड तास मुख्य रस्त्यावरील वाहतूक बंद हाती. ती नारायण चाळ माग्रे वळविण्यात आली.
जवखेडा प्रकरणी परभणीत दलित संघटनांचा निषेध मोर्चा
जवखेडा दलित हत्याकांडाची सीबीआय चौकशी व्हावी, तसेच आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी दलित संघटनांनी पुकारलेल्या परभणी ‘बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. परभणी शहरातील बाजारपेठ, शाळा, महाविद्यालय, नवा मोंढा कडकडीत बंद होता. काही काळ ऑटो रिक्षा व बससेवाही बंद होती.
First published on: 11-11-2014 at 01:30 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rally against jawakheda issue