एका समाजाचे श्रद्धास्थान व देव-देवतांविषयी अपमानकारक शब्द वापरून भावना दुखावल्याने एमआयएम नेत्यांवर कारवाई करा, एमआयएमवर बंदी घाला, यासह अन्य मागण्यांसाठी हिंदू धर्मसुरक्षा समितीने गुरुवारी विशाल मोर्चा काढला. मात्र, या वेळी काही कार्यकर्त्यांचा आगाऊपणा नडल्याने मोर्चाला गालबोट लागले. एका दुकानावर दगडफेक झाली, तर पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली.
एमआयएमचे प्रमुख खासदार असोदोद्दीन ओवेसी यांचे भाऊ आमदार अकबरोद्दीन ओवेसी यांनी राजकीय हेतूने एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत एका समाजाबद्दल अपशब्द वापरले. तसेच या समाजाचे दैवत व श्रद्धास्थानांविषयी अशोभनीय वक्तव्य करून दोन समाजात तेढ वाढविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे एमआयएमवर बंदी आणावी. आमदार ओवेसींना अटक करा आदी मागण्यांसाठी हिंदू धर्मसुरक्षा समितीने मोर्चा काढण्याचे ठरविले होते. मोर्चा प्रथम गाडीपुरा येथील रेणुकामाता मंदिरापासून निघणार होता. परंतु पोलिसांनी परवानगी नाकारल्याने पंचवटी हनुमान मंदिर, महावीर चौक येथून मोर्चा निघाला. मोर्चासाठी सराफा, होळी, चौखाळा, जुना गंज, गाडीपुरा, हडको, सिडको कौठा, वजिराबादसह शहराच्या अन्य भागांतून लोक मोठय़ा संख्येने जमले होते.
मोर्चामुळे व्यापाऱ्यांनी दुकाने उत्स्फूर्त बंद ठेवून प्रतिसाद दिला. महावीर चौक, वजिराबाद चौक, शिवाजी पुतळामार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पोहोचला. तेथे कार्यकर्त्यांनी देश व धर्मभक्तीपर गीते गाऊन, घोषणाबाजी देत परिसर दणाणून सोडला.
हिंदू धर्मसुरक्षा समिती, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, विहिंप, बजरंग दल, श्री संत पाचलेगावकर महाराज मुक्तेश्वर आश्रम, शिवा अ. भा. वीरशैव लिंगायत युवक संघटना, ब्राह्मण सेवा मंडळ, अखिल भारतीय मारवाडी युवा मंच, श्री योग वेदांत सेवा समिती, परदेशी धोबी समाज मंडळ, श्री राम जन्मोत्सव समिती, अखिल भारतीय क्षत्रीय महासभा, भाजपा, शिवसेना, मनसे, वसरणी युवक कार्यकर्ते, हडको हिंदू मित्रमेळा समिती, कापड व्यापारी असोसिएशन, सराफा असोसिएशन, श्रीराम जन्मोत्सव समितीने मोर्चाला पाठिंबा दिला.
गालबोट, सौम्य लाठीमार
मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विसर्जित झाल्यानंतर मोर्चेकरी परतत असताना नंदीग्राम मार्केट गांधी पुतळ्याजवळील काही दुकाने सुरू होती. ही दुकाने बंद करा, असा आग्रह कार्यकर्ते धरीत असताना काहींनी दगडफेक केली. यात अप्लायन्सेस या दुकानाची काच फुटली. त्यामुळे कोणालाही काहीच कळाले नाही. पोलिसांनी सौम्य लाढीमार करून जमाव पांगविला.

Story img Loader