खासगी विनाअनुदानित शाळांकडून शुल्कवाढ, शैक्षणिक साहित्य खरेदी एकाच दुकानातून करण्याची सक्ती, वर्षभराचे शुल्क आगाऊ घेणे, अशा मार्गानी पालकांची लूट केली जात असल्याची तक्रार करीत अशा शाळांविरुद्ध प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी शनिवारी शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचतर्फे काढण्यात आलेल्या मोर्चाद्वारे करण्यात आली. मंच व पालकांनी यापूर्वी शहरात वेगवेगळ्या विषयांवर आंदोलने केली आहेत. रासबिहारी इंटरनॅशनल स्कूलचा लढा वर्षभरापासून सुरू आहे. शाळेच्या दहशतीला बळी न पडता वर्षभर पालक व विद्यार्थी न्याय मागत आहेत. काही शासकीय अधिकाऱ्यांच्या वेळकाढू धोरणामुळे हा लढा अजूनही सुरू आहे. सिल्व्हर ओक या शाळेच्या नवीन व्यवस्थापनाने शिक्षक कर्मचाऱ्यांना जुन्या संस्थेचा राजीनामा देऊन करारावर नवीन संस्थेत येण्यासाठी दबाव टाकल्याची तक्रार मंचने केली आहे. ज्या शिक्षक कर्मचाऱ्यांनी त्यास नकार दिला, त्यांना व्यवस्थापनाने दहशतीखाली ठेवले. या शिक्षक कर्मचाऱ्यांच्या मुलांचे निकाल अडवून धरले असल्याचा आरोपही मंचने केला आहे. शाळांकडून विविध मार्गाने विद्यार्थी, पालक व शिक्षक कर्मचाऱ्यांना वेठीस धरण्याच्या या प्रकारांमध्ये जिल्हा प्रशासनाने दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. या प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करून सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन प्रशासनाने आंदोलकांना दिले. याबाबतची माहिती मंचचे पदाधिकारी प्रा. मिलिंद वाघ यांनी दिली.
विद्यार्थी व पालकांना वेठीस धरणाऱ्या शाळांविरोधात मोर्चा
खासगी विनाअनुदानित शाळांकडून शुल्कवाढ, शैक्षणिक साहित्य खरेदी एकाच दुकानातून करण्याची सक्ती, वर्षभराचे शुल्क आगाऊ घेणे, अशा मार्गानी पालकांची लूट केली जात असल्याची तक्रार करीत अशा शाळांविरुद्ध प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी शनिवारी शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचतर्फे काढण्यात आलेल्या मोर्चाद्वारे करण्यात आली.
First published on: 05-05-2013 at 01:53 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rally against school who keep impregnation to students and parents