सुरगाणा तालुक्यातील पळसन शासकीय आश्रमशाळेत शिकणाऱ्या मुलीवरील अत्याचाराची घटना अत्यंत वाईट आणि दुर्दैवी असून या घटनेची नि:पक्षपातीपणे चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भारताचा कम्युनिस्ट पक्ष (माकप) च्या जिल्हा समितीतर्फे करण्यात आली आहे. या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी सुरगाणा तहसील कार्यालयावर माकप व त्यांच्या जनसंघटनांच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहितीही समितीने दिली आहे. माकपने या घटनेचा तीव्र शब्दांत धिक्कार केला आहे. काही वृत्तपत्रांमध्ये या प्रकरणातील एक संशयित माकपचा कार्यकर्ता, तर एक संशयित स्थानिक जिल्हा परिषद सदस्याचा वाहनचालक असल्याचे प्रसिद्ध झाले आहे. परंतु या प्रकरणातील एकाही संशयिताचा माकपशी संबंध नसल्याचे तसेच कोणताही संशयित जिल्हा परिषद सदस्याचा वाहनचालक नसल्याचे समितीने नमूद केले आहे. माकपचा कार्यकर्ता असे कृत्य करू शकत नाही. माकपची भूमिका अशा समाजविघातक कृत्य करणाऱ्यांच्या कायम विरोधात असल्याचे पक्षाच्या जिल्हा शाखेचे सचिव कॉ. जे. पी. गावित आणि सुरगाणा तालुका किसान सभेचे अध्यक्ष कॉ. सुभाष चौधरी यांनी निवेदनात म्हटले आहे.

Story img Loader