टपरीवरचा ग्लासातील चहा, शंभर वर्षांच्या आजीचा आशीर्वाद, अगदी बालगोपाळांशीही हितगुज अन् शिवारात जाऊन भुईमुगाच्या शेंगांचा घेतलेला आस्वाद अशाप्रकारे थेट जनतेत दिलखुलास मिसळत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपला काल बुधवारचा धावता दौरा लक्ष्यवेधी ठरवला.
काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार व माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांची उमेदवारी डावलून दस्तुरखुद्द मुख्यमंत्रीच कराड दक्षिणमधून लढणार आहेत असे असताना, राज्याच्या नेतृत्वाविरुद्ध दंड थोपटले जात असून, उंडाळकरही रिंगणात उतरत आहेत. तर, काँग्रेस नेते विलासराव देशमुखांचे जावई अतुल भोसले यांची महायुतीतील उडी निवडणुकीत चुरस निर्माण करीत आहे.
काँग्रेसच्या पहिल्या यादीत कराड दक्षिण मतदार संघातून पृथ्वीराज चव्हाणांच्या नावाची वर्णी राहिल्याने मुख्यमंत्र्यांचा गट ताकदीने सतर्क झाला आहे. विविध पक्ष, संघटना व स्थानिक नेत्यांचा पाठिंबा खुले न करता ‘मी तुमचा, अवघ्या महाराष्ट्राचा’ अशी हाक देत पुन्हा मुख्यमंत्री पदाची संधी असल्याचा संदेश त्यांनी आपल्या दौऱ्यात दिला आहे. आपली उमेदवारी सक्षम व लोकहितार्थ असल्याचा विश्वासही त्यांनी दिला आहे. काल मुख्यमंत्र्यांनी उंडाळकरांच्या बालेकिल्ल्यात प्रचारदौरा केला. कोळे, तारूख, आणे, किरपे, पोतले, घारेवाडी, विंग, येरवळे या मोठय़ा खेडय़ांसह अगदी वाडीवस्तीवर दाखल होत त्यांनी ग्रामीण जनतेशी संवाद साधला. या वेळी विंग येथे झालेल्या जाहीर कार्यक्रमात कृष्णा कारखान्याचे माजी अध्यक्ष मदनराव मोहिते यांनी भाजपमध्ये गेलेले आपले पुतणे डॉ. अतुल भोसले यांचा चांगलाच समाचार घेतला. त्यामुळे मोहिते-भोसले गटातील कटुता वाढत असून, या घरच्या संघर्षांकडेही लोकांच्या नजरा लागून आहेत.
परंपरेने शक्तिप्रदर्शन, सभा, मेळावे, बैठका, जंगी पदयात्रा अन् भव्य मिरवणुका यांना फाटा देत थेट मतदारांच्या संपर्कात येत जनतेचा निर्णायक पाठिंबा मिळवण्याचा पृथ्वीराज चव्हाणांचा प्रयत्न आहे. विधानसभेची निवडणूक आणि राज्य कारभारातून वेळात वेळ काढून त्यांनी विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने अवघ्या मतदारसंघाचा फेरफटका पार करून अतिशय साध्या पद्धतीने आपली उमेदवारी लोकांसमोर आणली आहे. आपली व्होट बँक सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करीत ते काँग्रेसची विचारधारा आणि मतदारसंघात आणलेला बक्कळ निधी मतदारांच्या पसंतीस उतरवत निवडणुकीचे रान उठवून आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेसने थेट मुख्यमंत्र्यांनाच उट्टे काढण्याचा दिलेला इशारा अन् स्वपक्षीयांच्या बंडाळीमुळे कराड दक्षिणची लढत सर्वदूर लक्षवेधी ठरत आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांचे कुटुंब प्रचारात उतरले असून, मुख्यमंत्र्यांचाही थेट जनतेत संवाद वाढल्याने कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य आहे.
पृथ्वीराज चव्हाणांच्या कार्यालयाचे उद्घाटन
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्याची घडी बसवताना सर्वसामान्यांच्या हितार्थ सत्ता वापरली. अगदी प्रत्येक वाडीवस्तीला विकासाच्या प्रवाहात आणले. त्यामुळे त्यांना जनमताचं स्वबळ मिळाले असल्याने कराड दक्षिणमधून त्यांचा मोठय़ा मताधिक्याने विजय निश्चित असल्याचा विश्वास काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार आनंदराव पाटील यांनी व्यक्त केला.
काँग्रेसचे कराड दक्षिणचे उमेदवार पृथ्वीराज चव्हाण यांच्या मध्यवर्ती संपर्क कार्यालयाचे उद्घाटन ह. भ. प. भगवानमामा कराडकर यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या उमेदवारीचे जोरदार स्वागत करताना, त्यांची विक्रमी मताधिक्याने विजयाची हमी दिली.
मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे म्हणाले, की मुख्यमंत्र्यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी मतदान करण्याचे भाग्य आपल्याला लाभले असून, या संधीचे सोने करा. प्रत्येक कार्यकर्त्यांने स्वत:च उमेदवार असल्याचे मानून कामाला लागावे.
मोहन जाधव म्हणाले, की पृथ्वीराज चव्हाणांनी चार वर्षांपूर्वीचे वातावरण पूर्ण बदलून टाकले. त्यांना मुख्यमंत्री म्हणून राज्यातील जनतेने पहिली पसंती दिली असून, त्यांच्या माध्यमातून या मतदारसंघालाच नव्हे, तर अवघ्या महाराष्ट्राला निष्कलंक, बुध्दिमान विकास पुरूषाचे नेतृत्व लाभले आहे. स्मिता हुलवान म्हणाल्या, की पृथ्वीराजबाबांबद्दल महिलांना मोठा आदर व अभिमान आहे. जिल्हा परिषदेचे विरोधीपक्षनेते जयवंत जगताप व माजी उपनगराध्यक्ष फारूख पटवेकर यांनीही मुख्यमंत्र्यांच्या उमेदवारीचे समर्थन करताना, ते मोठय़ा मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाला विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, माजी नगराध्यक्षा अर्चनाताई पाटील, नगरसेवक बाळासाहेब यादव, श्रीकांत मुळे यांची उपस्थिती होती.
जनसामान्यांशी चर्चा करत मुख्यमंत्र्यांचा संपर्क दौरा सुरू
टपरीवरचा ग्लासातील चहा, शंभर वर्षांच्या आजीचा आशीर्वाद, अगदी बालगोपाळांशीही हितगुज अन् शिवारात जाऊन भुईमुगाच्या शेंगांचा...
First published on: 26-09-2014 at 02:10 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rally of cm prithviraj chavan