शहराच्या विस्कळीत पाणीपुरवठय़ास महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांना जबाबदार धरत शिवसेनेने शनिवारी मनपा कार्यालयावर मोठा मोर्चा नेत सत्ताधाऱ्यांचा निषेध केला. मनपाच्या दरावाजावर आंदोलकांनी मडके फोडून मनपा इमारतीचा दरवाजाही तोडला, त्यामुळे काही वेळ येथे तणाव निर्माण झाला होता. आमदार अनिल राठोड यांनी येत्या बारा तासात पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा इशारा दिला आहे. अन्यथा अधिकाऱ्यांना त्यांच्या दालनात बसू देणार नाही असे ते म्हणाले.
वादळी वारे व वीजपुरवठय़ातील अनियमिततेमुळे गेल्या काही दिवसांपासून शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. शिवसेनेने याबाबत वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनाही धारेवर धरले होते. शनिवारी त्यांनी मनपा कार्यालयावर मोर्चा नेला. मनपा इमारतीच्या मुख्य दरवाजावरच हा मोर्चा अडवण्यात आला. मोर्चा येण्याआधीच हे दरवाजे बंद करण्यात आले होते. ते पाहून संतप्त कार्यकर्त्यांनी या दरवाजावर माठ भिरकावत ते फोडले. मेर्चा येण्याआधीच येथे मोठा पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता, मात्र काही काळ येथे तणाव निर्माण झाला होता.
मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत घुसलेल्या कार्यकर्त्यांना इमारतीच्या दरवाजावर अडवण्यात आल्याने कार्यकर्त्यांनी हा दरवाजाच तोडण्याचा प्रयत्न करून तो उचकटला. मनपा आयुक्तांना भेटण्यास पोलिसांनी मज्जाव केला होता. मात्र दरवाजाच तोडून आंदोलक आत घुसले. राठोड यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते थेट आयुक्त विजय कुलकर्णी यांच्या दालनात घुसले. येथे झालेल्या चर्चेच्या वेळी राठोड यांनी आयुक्तांना त्यांनी रिकामा माठही भेट दिला.
येथे बोलताना राठोड यांनी मनपातील सतधाऱ्यांवर जोरदार आरोप केले. ते म्हणाले, शहराच्या विस्कळीत पाणीपुरवठय़ास तेच जबाबदार आहेत. मनपा ही सर्वसामान्यांची राहिलेली नसून ती एकाच कुटूंबाच्या ताब्यात गेली आहे, ती आता कुटूंबपालिका झाली आहे. मात्र सर्वसामान्य जनता ते कदापि सहन करणार नाही असा इसारा त्यांनी दिला. पक्षाचे शहरप्रमुख संभाजी कदम, माजी महापौर भगवान फुलसौंदर आदींची येथे भाषणे झाली. नगरसेवक अनिल शिंदे, दिलीप सातपुते, गणेश कवडे, अनिल लोखंडे, संजय चोपडा, विजय बोरूडे, प्रकाश भागानगरे आदी या आंदोलनात सहभागी झाले होते.
पाणीप्रश्नावर शिवसेनेचा मनपावर मोर्चा
शहराच्या विस्कळीत पाणीपुरवठय़ास महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांना जबाबदार धरत शिवसेनेने शनिवारी मनपा कार्यालयावर मोठा मोर्चा नेत सत्ताधाऱ्यांचा निषेध केला. मनपाच्या दरावाजावर आंदोलकांनी मडके फोडून मनपा इमारतीचा दरवाजाही तोडला, त्यामुळे काही वेळ येथे तणाव निर्माण झाला होता.
First published on: 08-06-2014 at 02:25 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rally on corporation by shivsena in issue on water