सांगली: भगवान महावीर यांची जयंती सांगली, मिरज शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने भगवान महावीर यांच्या मुर्तीची सजवलेल्या रथातून ढोल, ताशांच्या गजरासह भव्य मिरवणुक काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये राजकीय कार्यकर्त्यांबरोबरच तरूण, महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
जैन समाजाचे २४ वे तीर्थकर भगवान महावीर यांची जयंती आज मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सांगलीमध्ये सकल जैन समाजाच्यावतीने एकत्रित शोभा यात्रेचे नियोजन करण्यात आले होते. यामध्ये दिगंबर, श्वेतांबर, तेरापंथी जैन पंथिय मोठ्या श्रध्देने सहभागी झाले होते. अमिझरा पार्श्वनाथ देहरासर ट्रस्ट व जैन सोशल ग्रुपच्यावतीने कच्छी जैन भवनमध्ये रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात 350 जणांनी रक्तदान केले.
महावीर जन्मकल्याणक महोत्सवातंर्गत काढण्यात आलेल्या शोभायात्रेत चित्ररथ, घोडे, सजवलेला रथ यांचा समावेश होता.या मिरवणुकीमध्ये माजी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, आ. सुधीर गाडगीळ, महापौर दिग्विजय सुर्यवंशी, विशाल पाटील, दक्षिण भारत जैन सभेचे केंद्रिय उपाध्यक्ष भालचंद्र पाटील, कर्मवीर पतसंस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील, डॉ. अजित पाटील, माजी महापौर सुरेश पाटील, सुभाष शहा, रोहन मेहता, कुसुम चौधरी, सुशांत शहा, नागराजभाई छाजेड, महावीर बन्सल, छाया कुंभोजकर आदी सहभागी झाले होते.
मिरज शहरात सजविलेल्या हत्ती, घोड्यासह सुवर्णरथातून भगवान महावीर यांच्या मुर्तीची ढोल, वाद्यवृंदामध्ये मिरवणुक काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये स्थायी समितीचे माजी सभापती निरंजन आवटी, विवेक शेटे, सुकुमार पाटील, जिनराज कोल्हापुरे, आशिष शेटे, राजू चौगुले यांच्यासह अनेक तरूण पंचरंगी ध्वज घेउन मिरवणुकीत सहभागी झाले होते. मिरवणुक मार्गावर पद्यावती शांती सेवा फौंडेशनच्यावतीने तांदूळ मार्केट येथे शीतपेयाचे वाटप करण्यात आले. पाटील हौद येथील जैन मंदिरामध्ये महावीर जयंती निमित्त गेले चार दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आज मंदिरामध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.