शालेय विद्यार्थी वाहतूकदारांच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत श्रमिक रिक्षा, टॅक्सी, टेम्पो चालक-मालक सेनेच्या वतीने सोमवारी मोर्चा काढण्यात येणार आहे. विद्यार्थी वाहतूकदारांविरुद्ध प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आल्यानंतर दंड भरूनही वाहने कित्येक दिवस परत केली जात नाहीत, असा आरोप श्रमिक सेनेच्या वतीने करण्यात आला आहे. आतापर्यंत ३०० रिक्षांवर कारवाई करण्यात आल्याचेही म्हटले आहे. याशिवाय प्रत्येक शाळेजवळ अधिकृत थांबा मिळावा, वाहन चालविता येणाऱ्यांना शिक्षणाची अट शिथिल करून परवाना द्यावा, काळी पिवळी रिक्षा, टॅक्सी व खासगी गाडय़ांना विद्यार्थी वाहतुकीचा अधिकृत परवाना द्यावा, विद्यार्थी वाहतूक परवाना देताना शाळेचा ना हरकत दाखल्यासारख्या जाचक अटी टाकू नयेत, इलेक्ट्रॉनिक मीटर नसले तरी जुन्या मीटरवर पासिंग करावे, कारवाई झालेले वाहनाचे निलंबन न करता दंड भरून गाडी परत देण्यात यावी, गाडीत विद्यार्थी नसताना विद्यार्थी वाहतुकीच्या वाहनावर कारवाई करणे बंद करावे, अशा अनेक मागण्या विद्यार्थी वाहतूक सेनेच्या वतीने करण्यात आल्या आहेत. महाकवी कालिदास कलामंदिरपासून शालिमारमार्गे पंचवटीतील प्रादेशिक परिहवन कार्यालयावर मोर्चा जाणार आहे. मोर्चात केवळ शालेय विद्यार्थी वाहतूक श्रमिक सेना सहभागी होणार असून हा रिक्षा, टॅक्सीचा संप किंवा बंद नाही, याकडे श्रमिक सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुनील बागूल यांनी निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे.

Story img Loader