भाजपाचे घाटकोपर येथील आमदार राम कदम यांनी तरुणींना पळवून आणण्याची भाषा वापरल्यानंतर राज्यात तीव्र संताप व प्रतिक्रिया त्याच्या विरोधात उमटत आहेत. रायगड जिल्ह्यात आज अलिबाग काँग्रेस पक्षाच्या महिलांनी भाजप कार्यालयासमोर आ. राम कदम यांच्या विरोधात घोषणाबाजी, जोडे मारून व फोटो जाळून आपला संताप व्यक्त केला.

यावेळी राम कदम यांचे आमदार पद रद्द करण्याबाबत निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे यांच्याकडे देण्यात आले. यावेळी जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा अ‍ॅड. श्रद्धा ठाकूर, माजी राजीप सदस्या रविना ठाकूर, कविता ठाकूर, तालुकाप्रमुख योगेश मगर, अलिबाग मुरुड विधानसभा अध्यक्ष अड. प्रथमेश पाटील, अनंत गोंधळी, अड. महेश ठाकूर, प्रभाकर राणे व महिला पदाधिकारी, कार्यकर्त्यां मोठया संख्येने उपस्थित होत्या.

गोपाळकाला निमित्य आयोजीत दहिहंडी उत्सवात मुलींना पळवून नेण्याची भाषा केली होती. यावरून राज्यात गदारोळ माजला होता. सर्व स्तरातून आ. राम कदम यांच्यावर टीकेची जोड उठली आहे. राम कदम यांच्या या वृत्ती विरोधात अलिबाग महिला काँग्रेसतर्फे भाजप कार्यालयासमोर निर्दशने करण्यात आली. महिला काँग्रेस पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी राम कदम यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर राम कदम यांच्या फोटोला चपला मारून व फोटो जाळून निषेध केला. यावेळी राम कदम हाय हाय अशा घोषणाही देण्यात आल्या.  निर्दशनानंतर राम कदम यांचे आमदार पद रद्द करण्याबाबत मुख्यमंत्री यांच्याकडे निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे यांच्यामार्फत शिष्टमंडळाकडून निवेदन देण्यात आले.