BJP Mla  Ram Kadam wrong tweet about actress Sonali Bendre : गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या भाजप आमदार राम कदम यांच्या संकटांमध्ये आता नव्याने भर पडली आहे. वादग्रस्त वक्तव्याने मुक्ताफळं उधणाऱ्या राम कदम यांच्या ट्विटमुळे आता ते अडचणीत आले आहेत. परदेशात उपचारासाठी गेलेल्या अभिनेत्री सोनाली बेंद्रेच्या निधनाचं ट्विट त्यांनी केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘हिंदी व मराठी सिनेसृष्टीतली अभिनेत्री व एकेकाळी सर्व रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी व आपल्या अभिनयाने डोळ्याचे पारणे फेडणारी अभिनेत्री सोनाली बेंद्रे पडद्याआड’, असं ट्विट त्यांनी केलं होतं.

हे ट्विट चुकीचं असल्याचं लक्षात येताच ते डिलीट करण्यात आलं पण, स्क्रीनशॉटच्या माध्यमातून मात्र सध्या ते बरंच व्हायरल झालं असून, आता त्यांच्यावर अनेकांचाच रोष ओढावला आहे. मुख्य म्हणजे आपली ही चूक सावरुन नेण्यासाठी राम कदम यांनी आणखी एक ट्विट केलं असून, गेल्या दोन दिवसांपासून सोनाली बेंद्रेच्या प्रकृतीविषयीच्या अफवा पाहायला मिळत आहेत, मी त्यांच्या हितासाठी आणि उत्तम प्रकृतीसाठी प्रार्थना करतो, असं लिहित त्यांनी आपल्या चुकीवर पांघरुण घालण्याचा प्रयत्न केला.

दहीहंडीच्या उत्सवापासूनच राम कदम यांच्याविषयीच्या बऱ्याच चर्चा पाहायला मिळाल्या असून आपल्या बेताल वक्तव्यामुळे त्यांनी राजकीय नेतेमंडळींपासून सर्वसामान्यांचाही रोष ओढावला होता. ‘एखादी मुलगी पसंत असेल तर त्या मुलीला पळवून आणण्यात तुम्हाला मदत करेन’, असं विधान त्यांनी दहीहंडी उत्सवादरम्यान केलं होतं. ज्यानंतर त्यांना राज्यातील महिला आयोगाकडूनही नोटीस बजावण्यात आली होती. आपल्यासमोर आलेल्या या अडचणींमध्ये वाढ होत असल्याचं लक्षात येताच त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सर्वांची माफीही मागितली होती. याच वादाला पूर्णविराम मिळत नाही, तोच पुन्हा एकदा राम कदम यांची चूक झाली आणि ती आता त्यांना चांगलीच भोवली असल्याचं पाहायला मिळत आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ram kadam bjp mla wrong tweet about actress sonali bendre death