सातारा: सत्तेत राहण्यासाठी रामराजे नेहमी पक्ष बदलतात. त्यांनी महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडून कामे करून घेतली आहेत आणि आता ते त्यांची फसवणूक करत आहेत. ते निश्चित तुतारीकडे जाणार आहेत. ते शरद पवारांकडे गेले, मायावतीकडे किंवा समाजवादी पार्टीत गेले तरी रामराजेंचा आणि त्यांचे उमेदवार दीपक चव्हाण यांचा पराभव निश्चित आहे. तिकडे जाताना कोणालातरी नावे ठेवायची आणि कोणाकडे तरी बोट दाखवायचे म्हणून ते माझे नाव घेऊन तिकडे जात असल्याचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
रणजीत सिंह नाईक निंबाळकर फलटण येथे पत्रकारांशी बोलत होते. शनिवारी रामराजे नाईक निंबाळकर यांनी तालुक्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता. यावेळी त्यांनी रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती. याबद्दल ते पत्रकारांशी बोलत होते.

रामराजेंनी महायुतीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्याकडून अनेक कामे करून घेतली आहेत. यामध्ये स्वतःचीही त्यांनी काही कामे करून घेतली आहेत. ते आता त्यांची फसवणूक करत आहेत. त्यांनी कोणताही महायुतीचा धर्म पाळलेला नाही आणि आता सगळ्यांना ते त्यांच्या वेळेला महायुतीचा धर्म शिकवत आहेत. ते तुतारीकडे जाणार हे निश्चित आहे. फक्त जाताना कोणालातरी नावे ठेवायची आणि कोणाकडे तरी बोट दाखवायचे तसे ते मला नावे ठेवत आहेत आणि माझ्याकडे बोट दाखवत आहेत. जे कार्यकर्ते आज त्यांना तुतारीकडे जाऊया शरद पवारांकडे जाऊया असे सांगत आहेत. त्यांनी लोकसभा निवडणुकीत माझ्या विरोधातच तुतारीचे काम केले आहे. काही लोकांनी माझ्या विरोधात काम केले असेल तरी ते माझ्या पक्षात येत असतील तर त्यांना माझ्या पक्षात घेण्याचा व माझा पक्ष वाढविण्याचा मला अधिकार आहे.

हेही वाचा – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची स्वतंत्र मतदारसंघाची मागणी, पण महात्मा गांधींचा विरोध; जाणून घ्या ‘पुणे करारा’त काय ठरले?

हेही वाचा – पवार फिरले… निकालही फिरला!

भाजपा शिवसेना युतीच्या काळात त्यांनी कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्षपद, यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर त्यांनी सत्तेमध्ये पदे मिळविली. त्यानंतर नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष, विधान परिषदेचे सभापती अशी सर्व पदे त्यांना मिळाली. आताही त्यांना काहीतरी नवीन पद हवे आहे. मात्र, त्यांच्या वागण्याची पद्धत अजित पवार यांना माहिती असल्याने त्यांनी त्यांना नव्याने कोणतेही पद दिलेले नाही. महायुती सरकारने फलटण विधानसभा मतदारसंघाला भरभरून निधी दिला आहे. फलटण शहरातील विकासासाठी मोठा निधी, पाणी प्रश्न,रस्ते विकास, रेल्वे, औद्योगिक वसाहत अशी अनेक कामे मंजूर केली आहेत. याशिवाय लोकांसाठी लाडकी बहीणपासून अनेक योजना राबवल्या आहेत. महायुतीच्या सरकारवर इथले लोक खुश आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत या ठिकाणी महायुतीचे उमेदवार असतील तेच निवडून येणार आहेत आणि रामराजे आणि त्यांचे उमेदवार दीपक चव्हाण पराभूत होणार आहेत. त्यांनी आता कोणाची मदत घेतली तरी त्यांना कोणीही वाचू शकत नाही. लोकांना त्यांच्या वागण्याची पद्धत कळून चुकली आहे. तुमच्या विकासाच्या खोट्या भूलथापांनी मतदारसंघाचे मोठे नुकसान झाले आहे. लोकांना ते कळून चुकले आहे. त्यामुळे त्यांनी काही केले तरी त्यांचा पराभव निश्चित आहे. फक्त तिकडे जाताना ते माझ्याकडे बोट दाखवत आहेत, असेही रणजीत सिंह नाईक निंबाळकर म्हणाले.