मोहनीराज लहाडे, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नगर : विधान परिषदेसाठी उमेदवारी देऊन भाजपने माजी मंत्री राम शिंदे यांचे एक प्रकारे पुनर्वसनच केले आहे. भाजपने आगामी काळातील ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर धनगर समाजातील आणखी एका चेहऱ्याला झळाळी तर दिली आहेच शिवाय राम शिंदे यांना ते पराभूत झालेल्या कर्जत-जामखेड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्याविरोधात, पर्यायाने पवार कुटुंबीयांविरुद्ध लढण्यास बळही दिले आहे. शिदे यांच्या पुनर्वसनातून जिल्ह्यात त्यांना पक्ष संघटनेच्या उतरलेल्या कळेला पुन्हा जोमाने उभे करण्याचे आव्हान स्वीकारावे लागणार आहे. त्याचबरोबर त्यांचा पक्षांतर्गत विखे यांच्याशी असलेला संघर्षही भविष्यात तीव्र होण्याची शक्यता आहे.

बीड जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या नगर जिल्ह्यातील काही तालुक्यांतून भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा प्रभाव आहे. त्यात राम शिदे यांच्या पूर्वीच्या कर्जत-जामखेड मतदारसंघाचाही समावेश आहे. पंकजा मुंडे यांना भाजपमध्ये सातत्याने डावलले गेल्याने वंजारी समाजात नाराजीची भावना आहे. ही परिस्थिती राम शिंदे

कशी हाताळतात हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सुरुवातीच्या काळात पंकजा मुंडे यांच्यासमवेत असलेले राम शिंदे नंतर परिस्थिती लक्षात घेऊन भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू झाले. आता देवेंद्र फडणवीस यांनी नगरची जबाबदारी स्वीकारली असल्याने राम शिंदे यांना जिल्हा भाजपमध्ये अधिक महत्त्व प्राप्त होणार आहे.

सन २०१४ पेक्षा सन २०१९ मध्ये विधानसभेतील भाजपचे जिल्ह्याचे संख्याबळ घटले. याच काळात राम शिंदे यांच्याकडे सलग पाच वर्षे नगरचे पालकमंत्रीपद होते. घटलेले संख्याबळ त्यांची कामगिरी प्रभावी झाली नसल्याचे दाखवते. त्यांच्यासह काही विद्यमानांना पराभव स्वीकारावा लागला. या पराभवातून त्यांचा व आमदार राधाकृष्ण विखे, खासदार डॉ. सुजय विखे यांच्याशी संघर्ष उभा राहिला. विखे पितापुत्रांबद्दल वरिष्ठांकडे तक्रारीही करण्यात आल्या होत्या. विखे यांच्याविषयीची सल शिंदे यांच्या मनात अद्याप आहे. शिंदे व खा. विखे यांच्यातील मतभेद वेळोवेळी पुढे आले आहेत. शिंदे यांना आता पक्षाने बळ दिल्याने हा संघर्ष भविष्यात तीव्र होण्याची शक्यता आहे.

कर्जत-जामखेडमधील शिंदे यांच्या पराभवानंतर कर्जत नगरपालिकेची सत्ताही भाजपने गमावली. भाजपचे प्रमुख कार्यकर्ते पक्षाला सोडून जाऊ लागले आहेत. ही गळती राम शिंदे यांना थांबवता आलेली नाही. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या आक्रमक कार्यशैलीमुळे भाजपचा बालेकिल्ला ढासळला. तो सावरण्याचे प्रयत्न शिंदे यांच्याकडून झाले नाहीत. चोंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंतीचा कार्यक्रम आयोजित करून व त्याला आपले आजोबा आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना निमंत्रित करून आमदार पवार यांनी धनगर समाजाला चुचकारण्याचा प्रयत्न केला. आरक्षणाच्या मुद्दय़ावरून धनगर समाजाचा राष्ट्रवादीबद्दल रोष आहे, तो कमी करण्याच्या प्रयत्नाबरोबरच या कार्यक्रमातून अप्रत्यक्षपणे शिंदे यांच्या समाजाच्या आधाराला शह देण्याचा प्रयत्न झाला. या लढाईत हतबल झालेल्या शिंदे यांना आता पक्षाने बळ दिले आहे. त्यामुळे आता शिंदे पवार कुटुंबीयांविरुद्ध लढाई उभारू शकतील.

ज्येष्ठ नेते अण्णा डांगे भाजपमध्ये मंत्री असताना त्यांनी चोंडी विकास प्रकल्पाला सुरुवात केली. या प्रकल्पाकडे दैनंदिन लक्ष देण्यासाठी त्यांनी सुशिक्षित चेहरा म्हणून अहिल्यादेवींच्या माहेरकडील वंशज राम शिंदे यांची प्रकल्पावर सदस्य म्हणून नियुक्ती केली आणि शिंदे भाजपचे कार्यकर्ते झाले; परंतु नंतर डांगे यांनीच भाजपला सोडचिट्ठी दिली. १९९७ मध्ये त्यांनी पंचायत समितीची निवडणूक लढवली, मात्र ते थोडय़ा मतांनी पराभूत झाले.

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतरही फडणवीस यांनी शिंदे यांना प्रदेश भाजपच्या कोअर समितीत घेतले. विखे वगळून जिल्हा भाजपच्या प्रमुख नेत्यांनी शिंदे यांना विधान परिषदेची उमेदवारी द्यावी, अशी शिफारस प्रदेश भाजपकडे केली होती. प्रदेश भाजपने शिंदे यांना बळ देऊन नगर जिल्ह्यात भाजपचे संघटन पुन्हा मजबूत करण्याचे संकेत दिले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ram shinde political rehabilitation give strength to bjp in ahmednagar city zws
Show comments