Ram Shinde on Ajit Pawar & Rohit Pawar in Karjat Jamkhed Assembly Election : “कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात मी कटाचा बळी ठरलो”, असं येथील पराभूत उमेदवार व भाजपा नेते राम शिंदे यांनी म्हटलं आहे. माझा पराभव हा नियोजित कट होता आणि या कटात अजित पवार सहभागी असल्याचा संशय शिंदे यांनी व्यक्त केला आहे. तसेच, “अजित पवारांनी रोहित पवारांच्या विरोधात सभा घेतली असती तर काय झालं असतं?” असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे. पराभवानंतर राम शिंदे म्हणाले, “त्यांच्या (पवार कुटुंब) राजकीय सारीपाटात माझा बळी गेला आहे”. कर्जत-जामखेड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार रोहित पवार यांनी भाजपा उमेदवार राम शिंदे यांचा १,२४३ मतांनी पराभव केला आहे. रोहित पवारांना १,२७,६७६ मतं मिळाली आहेत. तर, राम शिंदे यांना १,२६,४४३ मतं मिळाली आहेत. या पराभवानंतर राम शिंदे यांनी अजित पवारांवर टीका केली आहे.
राम शिंदे म्हणाले, “आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मेढा येथे एक वक्तव्य केलं आहे. त्या वक्तव्यावरून एक गोष्ट लक्षात आली आहे की महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लागण्यापूर्वीच त्यांच्यात कौटुंबिक अघोषित करार झाला होता. किंबहुना कर्जत-जामखेडसंदर्भात करार झाला होता. माझ्याविरोधात कट रचला गेला होता आणि मी त्या कटाचा बळी ठरलो आहे. मला आज त्याचा प्रत्यय आला”.
हे ही वाचा >> विधानसभेतील पराभवानंतर दोन्ही ठाकरे एकत्र येणार? राऊतांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, “महाराष्ट्र व मुंबईसाठी…”
राम शिंदे यांचा आरोप काय?
राम शिंदे म्हणाले, “मी वारंवार महायुतीचा धर्म पाळण्यासंदर्भात वरिष्ठांकडे व अजित पवारांकडे मागणी करत होतो. परंतु, आज अजित पवार यांनी रोहित पवारांना स्वतःच सांगितलं की मी सभेला आलो असतो तर तुझं काय झालं असतं? याचा अर्थ हा नियोजित कट होता आणि त्या कटात माझा बळी गेला आहे. या सगळ्या राजकीय सारीपाटात मी बळी ठरलो आहे”. दरम्यान, यावेळी राम शिंदे यांना प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही यासंदर्भात वरिष्ठांकडे तक्रार करणार आहात का? त्यावर शिंदे म्हणाले, “मला माझ्या वरिष्ठांना, महायुतीमधील वरिष्ठ नेत्यांना सुचवायचं आहे की हे सगळं महायुतीसाठी चांगलं नाही. माझ्यासाठी तर नाहीच नाही. यावर वरिष्ठांनी गांभीर्याने दखल घ्यावी, अशी माझी अपेक्षा आहे.”
हे ही वाचा >> देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार? भाजपा नेत्याचा दुजोरा, एकनाथ शिंदेंचं काय? म्हणाले, “भाजपाचा स्ट्राईक रेट..”
अजित पवार-रोहित पवार यांच्यातील कराड येथील भेटीवेळी काय घडलं?
दरम्यान, आज अजित पवार कराड येथील प्रीतीसंगमावर असताना त्यांची रोहित पवारांशी भेट झाली. यावेळी रोहित पवार त्यांच्या पाया पडले. त्यानंतर अजित पवार रोहित पवारांना “शहाण्या थोडक्यात वाचलास” असं म्हणाले.