कर्जतः नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदी काँग्रेस पक्षाच्या रोहिणी सचिन घुले यांची आज, मंगळवारी बिनविरोध निवड झाली आहे. अधिकृत घोषणा २ मे रोजी होणाऱ्या निवड सभेत केली जाईल. गेले काही दिवस सर्वत्र चर्चेत आलेली आणि सभापती राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांच्या प्रतिष्ठेच्या झालेल्या या निवडणुकीत शिंदे यानी बाजी मारली आहे. ही निवड रोहित पवार यांच्यासाठी धक्का मानली जात आहे.

उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या आजच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) व आमदार रोहित पवार यांच्या कट्टर समर्थक प्रतिभा भैलुमे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे आता नगराध्यक्ष पदासाठी रोहिणी घुले यांचाच एकमेव अर्ज राहिल्याची माहिती पालिकेचे मुख्याधिकारी अक्षय जायभाय यांनी दिली.

कर्जत नगरपंचायतच्या सन २०२२ साली झालेल्या निवडणुकीत रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीची सत्ता स्थापन झाली होती. १७ पैकी १२ नगरसेवक राष्ट्रवादीचे व तीन नगरसेवक काँग्रेस पक्षाचे निवडून आले होते. भाजपला अवघ्या दोन जागा मिळाल्या होत्या.

नगराध्यक्ष पदासाठी रोहित पवार यांनी अडीच वर्षांसाठी उषा राऊत व उपनगराध्यक्ष पदासाठी रोहिणी घुले यांना संधी दिली. मात्र आघाडीच्या नगरसेवकांत सातत्याने धूसफुस सुरू होती. मुदत संपल्यानंतर उषा राऊत यांना राज्य सरकारच्या नियमामुळे पुन्हा संधी मिळाली. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी नगरसेवकांमध्ये असलेल्या नाराजीचा फायदा घेत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये फूट पाडली आणि ११ पैकी तब्बल ८ नगरसेवक फोडले. काँग्रेसचे तिघे नाराज असल्यामुळे तेही सोबत आल्यामुळे राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली १३ नगरसेवकांची मोट बांधली गेली. गटनेते फुटल्यामुळे रोहित पवार गटाला कोणतीही संधी मिळाली नाही. एवढेच नव्हे तर राम शिंदे यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केल्यानंतर योग्य डावपेच आखत राम शिंदे यांनी रोहित पवार यांना पूर्णपणे नामोहरण केले.

उषा राऊत यांनी अविश्वास प्रस्तावाला सामोरे न जाता राजीनामा दिल्यानंतर नवीन नगराध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू झाली. नगराध्यक्ष पदासाठी राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली रोहिणी सचिन घुले यांनी तर रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली प्रतिभा भैलुमे त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. बहुमत नसताना भैलुमे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे पुन्हा नगरसेवकांमध्ये फूट पडणार का, अशी जोरदार चर्चा सुरू झाली होती. मात्र आज सायंकाळी ४ पर्यंत, मुदत संपण्यापूर्वी श्रीमती भैलुमे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. यामुळे एकमेव अर्ज राहिलेल्या रोहिणी सचिन घुले या नगराध्यक्ष झाल्या आहेत. मात्र त्यांची घोषणा २ मे रोजी होईल.

गटनेता निवड न्यायालयात

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून गटनेता म्हणून अमृत काळदाते व उपगटनेता प्रतिभा भैलुमे यांची निवड जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळल्याने. यावर निकालाच्या विरुद्ध अमृत काळदाते यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. याबाबत श्री काळदाते यांचे वकील महेश देशमुख यांनी माहिती सांगितली की, जिल्हाधिकारी यांच्या निकालाच्या विरोधात न्यायाधीशांसमोर आम्ही मांडणी केली की जिल्हाधिकारी हे प्रशासकीय अधिकारी आहेत, त्यामुळे त्यांनी प्रशासकीय काम करण्याची आवश्यकता असताना केले नाही व संख्या तपासणी हा त्यांचा अधिकार नाही तरी त्याचा वापर केला. यामुळे आमच्या नैसर्गिक न्यायहक्काची पायमल्ली झाली. यावर सरकारी वकिलांनी जिल्हाधिकारी यांची सर्व बाजू मांडताना उद्या, बुधवारी सकाळपर्यंत आम्हाला वेळ द्यावा, अशी विनंती केली. त्यानुसार न्यायालयाने उद्या सकाळपर्यंतची वेळ सरकारी वकिलांना दिली आहे. या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान विद्यमान गटनेता संतोष मेहत्रे यांनीही औरंगाबाद खंडपीठांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला निर्णय योग्य असल्याची बाजू वकिलांच्या माध्यमातून मांडली आहे.