पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २२ जानेवारी या दिवशी राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी सुरु झाली आहे. तसंच यावरुन जोरदार राजकारणही रंगताना दिसतं आहे. कारण काँग्रेसने हा संपूर्ण कार्यक्रम निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून केल्याचा आरोप केला आहे. तसंच राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमंत्रणांवरुनही आरोपांच्या फैरी झडत आहेत. अशात पवित्र मानल्या जाणाऱ्या चार पीठांच्या चार शंकराचार्यांनी राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला येणार नसल्याचं म्हटलं आहे. याविषयी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, संत साहित्याचे अभ्यासक, लेखक आणि ज्येष्ठ विचारवंत सदानंद मोरे यांनी थेट भूमिका मांडली आहे.
काय म्हटलं आहे सदानंद मोरे यांनी?
“आद्य शंकराचार्य हे आठव्या शतकात वैदिक धर्म म्हणजेच आपला हिंदू धर्माचं संरक्षण केलं. ते दोन पातळ्यांवर केलं. अंतर्गत वाद होते ते त्यांनी संपवले. वेगळी दर्शनं आणि देवता होत्या. दर्शनं, देवतांना मानणारे पंथ आणि उप पंथ, यांची स्पर्धा होती. त्या सगळ्याला आळा घालण्याची गरज निर्माण झाली. वैदिक धर्माचा प्रतिस्पर्धी धर्म होता तो म्हणजे बौद्ध धर्म. त्यापासून बचाव करण्याची गरज होती. काही गोष्टी अशा असतात ज्या इतरांकडूनही घेता आल्या पाहिजेत. आपल्या धर्मात अशी कुठली गोष्ट आहे? ज्याची उणीव भासते आणि लोक दुसरीकडे (दुसऱ्या धर्मात) वळतात. त्यामुळे तिथल्या गोष्टी चांगल्या असतील तर त्या सुद्धा घ्यायला हरकत नाही अशा एका व्यापक दृष्टीकोनातून शंकराचार्यांनी कार्य केलं. ते कार्य एककेंद्री होऊ नयेत म्हणून त्यांनी चार पीठं स्थापन केली. देशातल्या चार दिशांना ती पीठं आहे. त्यात उप-पीठं आहेत. श्रेष्ठ कोण यांचा वाद अधूनमधून सुरु असतात.”
हे पण वाचा- “अयोध्येतल्या मंदिरात धर्मशास्त्राच्या विरोधात कार्य होताना आम्ही.., शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचं वक्तव्य
सदानंद मोरे पुढे म्हणाले, “काही वर्षांचा काळ लोटल्यानंतर मुस्लिमांचं आक्रमण झालं. लहान-मोठे राजांना जिंकून त्यांची सत्ता सुरु झाली. त्यानंतर ब्रिटिश आले. त्या काळातही धर्माचे राज्यकर्ते होते. आचार्यांच्या काळात जैन, बौद्ध असतील तरीही ते इथलेच होते. त्या धर्मांमध्ये खूप गोष्टी समान आढळतात. वेगळ्या धर्माचे लोक आल्यानंतर फरक पडला. पण हिंदू धर्म वाचला. आता यात चार शंकराचार्यांचा वाटा काय ते समजून घेणं महत्त्वाचं आहे.” असं सदानंद मोरेंनी म्हटलं आहे. ‘थिंक बँक’ या यूट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत मांडलं.
हिंदू धर्म हा धाक दाखवणारा धर्म नाही
याबाबत बोलताना सदानंद मोरे म्हणाले, “दुसऱ्या धर्मातल्या लोकांना आपल्या धर्मात घेणं ही कल्पना हिंदू धर्मात नाही.स्वतःहून कुणी आलं तर गोष्ट वेगळी, पण मुद्दाम एखादं प्रलोभन दाखवून किंवा धाक दाखवून, बळाचा प्रयोग करुन हिंदू धर्मात आणायचं असं नाही. त्याचा परिणाम व्हायचा तो झाला. मग जे शिल्लक राहिलेले हिंदू होते त्यांचं धार्मिक नियमन करण्यामध्ये शंकराचार्यांचा मठांचा वाटा होता. धर्माच्या संदर्भात कुठलाही वाद निर्माण झाला तर तो शंकराचार्यांकडे जात असे. उदाहरणच द्यायचं झालं तर बहिणीचा मुलगा दत्तक घ्यायचा की नाही? हा प्रश्नही शंकराचार्यांपुढे मांडला जायचा. कारण भावाचा मुलगा दत्तक घेण्याची पद्धत रुढ होती. भगिनी दत्तकाचा वाद कोण ठरवणार? तर शंकराचार्य असं होत होतं. लोकमान्य टिळक आणि काही मंडळी चर्चमध्ये गेली होती. त्यांनी चहा प्यायला, बिस्किटं खाल्ली असंही तेव्हा बोललं गेलं होतं. त्यांच्याकडून अधर्म झाला, म्हणून त्यांच्याविरोधात शंकराचार्यांकडे फिर्याद करण्यात आली. त्यानंतर टिळक वगैरे मंडळींना बहिष्कृत करण्यात आलं. ती कुणी घेतली कुणी घेतली नाहीत.” असं सदानंद मोरे म्हणाले.
संत परंपरेमुळे आपला धर्म टिकला
“शंकराचार्यांबाबत मला एक महत्त्वाची गोष्ट वाटते ती अशी की धर्म ही एक परिवर्तनशील गोष्ट आहे. धर्म राहिला पाहिजे यासाठी धर्मात बदल करणं आवश्यक ठरतं. ते कोण करु शकतं? ज्याला आत्ताच्या परिस्थितीचं ज्ञान आहे. फक्त धर्मशास्त्र येत असलं, धार्मिक ग्रंथाचं ज्ञान पुरेसं नाही. देशःकाल परिस्थिती ही माहीत असली पाहिजे. अशा प्रकारचं ज्ञान शंकराचार्यांना असावं याची सक्ती नव्हती. त्यामुळे ती मंडळी त्यांच्या पद्धतीने परंपरेला चिकटून राहिली. तरीही धर्म टिकला कारण महाराष्ट्रातल्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यात जे साधू संत झाले त्यांनी हा धर्म टिकवला. हिंदू धर्म टिकवण्यात शंकराचार्यांचा वाटा फार कमी आहे. महाराष्ट्राचा विचार केला तरीही ही गोष्ट लक्षात येते, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, नामदेव महाराज, एकनाथ महाराज हे कुठल्या पीठाशी संलग्न होते? एकाही नाही. चैतन्य प्रभूंनी बंगालमध्ये केवढं काम केलंय. ओरिसात गेल्यावर हीच बाब आढळते. संत निर्माण झाले म्हणून आपला धर्म टिकला, हे माझं स्पष्ट मत आहे. कारण इतिहास पाहिला तर आपल्याला हेच दिसतं.”
छत्रपती शिवराय यांनी नेमकं काय केलं?
“पुढच्या काळात हिंदू धर्मातून बाहेर गेलेले लोक आहेत त्यांना पुन्हा धर्मात घ्यायचं की नाही? तर याची सुरुवात छत्रपती शिवरायांनी केली. नेताजी पालकरला छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा धर्मात घेतलं. संभाजी महाराजांनीही लोकांना धर्मात घेतलं. या सगळ्यात शंकराचार्यांची भूमिका कुठेच दिसत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा जेव्हा राज्याभिषेक झाला तेव्हा त्यांच्या क्षत्रिय असण्याचा मुद्दा निर्माण झाला होता. मुळात कलियुगात क्षत्रिय आहेत का? हाच प्रश्न त्यावेळच्या लोकांना पडला होता. त्यावेळी गागाभट्ट नावाचे एक सद्गृहस्थ महाराष्ट्राचेच होते, काशीमध्ये जाऊन ते स्थायिक झाले. त्यांचं घराणं मोठं झालं. ते आले त्यांनी निर्णय दिला की छत्रपती शिवाजी महाराज हे क्षत्रिय आहेत. त्यानंतर राज्याभिषेक होऊ शकला. कायस्थ प्रभूंच्या बाबतीत वाद निर्माण झाला तेव्हाही गागा भट्ट आले होते. माझा असा प्रश्न आहे की शंकराचार्य तेव्हा नेमके कुठे होते? किंवा छत्रपती शिवराय यांनी हा प्रश्न त्यांच्या समोर का नेला नाही? कदाचित त्यांना ही कल्पना असावी की हे लोक काही करणार नाहीत. कारण ते धर्माला चिकटून बसले आहेत. ब्रिटिश काळात विवेकानंद होते, इतर विचारवंत निर्माण झाले. चळवळी निर्माण झाल्या. पतित परावर्तन वगैरे गोष्टी निर्माण झाल्या, ज्यात धर्माबाहेरच्या लोकांना धर्मात घेतलं जात होतं. त्यातही कुठेच शंकराचार्यांचा वाटा दिसत नाही.” असं सदानंद मोरे यांनी म्हटलं आहे.
शाहू महाराज आणि लोकमान्य टिळक यांनी काय केलं?
“शाहू महाराज, लोकमान्य टिळक यांना हे वाटलं की शंकराचार्य फक्त धर्माचे अभ्यासक नकोत तर ते देशःकाल परिस्थिती म्हणजेच देशातली सद्यस्थिती काय आहे याची जाण असणारे हवेत. असा एक माणूस त्यांना सापडला. महाभागवत कुर्तकोटी. ते एम. ए. झाले होते. त्यांनी पीएचडी केलेली होती. त्यांना शंकराचार्य करण्यात आलं. लोकमान्य टिळक आणि शाहू महाराजांमध्ये वाद होते. पण या बाबतीत या दोघांचं एकमत झालं होतं. पुढे ते राजकारणात भाग घेऊ लागले. शाहू महाराजांना ज्या गोष्टी करायच्या होत्या त्या त्यांनी केल्या. ज्यामुळे कृतकोटींना त्यावेळी कोल्हापूर सोडावं लागलं. त्यानंतर ते नाशिकला गेले. शाहू महाराजांनी त्यांना बरखास्त केलं. कारण कृतकोटींचं राजकारणात भाग घेणं त्यांना पटलं नव्हतं. नाशिकला गेल्यानंतर कुर्तकोटींनी काय केलं? तर हिंदू महासभा ही जी प्रादेशिक संघटना होती ती संघटना भारतीय पातळीवर नेलं. त्यानंतर कृतकोटी त्याचे राष्ट्रीय हिंदू महासभेचे अध्यक्ष झाले. त्यामुळे त्या काळापासून शंकराचार्य हे सार्वजनिक जीवनात आले. शुद्धी परिषदेला ते जाऊ लागले. राजकीय भेटीगाठी घेऊ लागले. १९३० मध्ये कुर्तकोटींनी नाटक लिहिलं त्यात धर्माबाहेर गेलेल्या लोकांचं शुद्धीकरण केलं पाहिजे ही भूमिका मांडली होती.” असं सदानंद मोरे म्हणाले.
धर्म ही परिवर्तनशील गोष्ट आहे
“या सगळ्या गोष्टी घडत असताना अस्पृश्य मंडळींना जर योग्य पद्धतीने वागवलं नाही तर ते तुमचा धर्म सोडतील हे त्या काळात सगळ्यांनाच माहीत होतं. पण एकाही शंकराचार्यांना वाटलं नाही की हा मुद्दा गांभीर्याने घ्यावा. पण ही बाब कुर्तकोटींना वाटत होती. बाबासाहेब आंबेडकरांनी नाशिकच्या काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा यासाठी जे आंदोलन केलं त्यात कुर्तकोटी आघाडीवर होते.त्यांच्या डोक्याला त्या आंदोलनात जखम झाली होती. असा शंकराचार्य देशाला हवा. धर्म ही परिवर्तनशील गोष्ट आहे हे त्यांना मान्य हवं. हे ज्ञान शंकराचार्यांना असेल आणि देशातली परिस्थिती कळत असेल तर शंकराचार्यांचा धर्मासाठी उपयोग होईल. नाहीतर असून अडचण आणि नसून खोळंबा अशीच स्थिती आहे.” असं परखड मत सदानंद मोरेंनी मांडलं.
शंकराचार्य व्यापक स्तरावर कुठेच दिसत नाहीत हे वास्तव
“शंकराचार्य हे व्यापक स्तरावर कुठेही दिसत नाहीत. अस्पृश्यांना परत घ्यायचं की नाही? या सगळ्या गोष्टींमध्ये शंकराचार्य पडले नाहीत. ते फक्त धर्माला चिकटलेलेच राहिले. रोमन कॅथलिक संस्कृतीची मागच्या १०० वर्षांचा विचार केला तर ज्या चुका झाल्या त्याबद्दल पोपने माफी मागितल्याचं दिसून येतं. आपल्याकडे हे दिसत नाही. बाबासाहेब आंबेडकर २० ते २५ वर्षे सांगत होते की आम्हाला नीट वागवा. येवल्याच्या सभेत ते असंही म्हणाले की मी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरीही हिंदू म्हणून मरणार नाही. कोण गेलं त्यांना सांगायला असं करु नका? तर तो एकच माणूस होता ते म्हणजे कुर्तकोटी. पण इतर कुणीही त्यांचं म्हणणं गांभीर्याने घेतलं नाही. हिंदू धर्म हा कडवट धर्म नाही, दुसऱ्याच्या अंगावर चालून जाणारा धर्म नाही. माझ्यापुरतं विचाराल तर मी धर्मनिरपेक्ष आहे. मी का धर्मनिरपेक्ष आहे तर मी हिंदू आहे म्हणून धर्मनिरपेक्ष आहे” असं सदानंद मोरेंनी म्हटलं आहे.