धाराशिव : बालाघाट पर्वतरांगांमधील येडशी अभयारण्यात असलेल्या रामलिंग धबधब्याचा प्रवाह ओसंडून वाहू लागला आहे. अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच मृग नक्षत्रात धबधबा सुरू झाल्यामुळे निसर्गप्रेमींसाठी आनंदाची पर्वणी उपलब्ध झाली आहे. सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या या पर्यटनस्थळाला दरवर्षी राज्य आणि राज्याबाहेरील हजारो पर्यटक भेट देतात. धबधबा आणि येथील रामलिंग तीर्थक्षेत्र अनेकांच्या आकर्षणाचे प्रमुख केंद्र आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

धुक्यात हरवून गेलेले अभयारण्य, मोरांचा कर्णमधुर आवाज, माकडांचे नटखट चाळे आणि समुद्राच्या लाटेची अनुभूती यावी, अशी डोंगरावरून खाली कोसळणार्‍या धबधब्याची गाज, आणि डोंगरदरीत अत्यंत सुबकदार नक्षीकाम केलेले महादेवाचे मंदिर. हे विलोभनीय चित्र अनुभवण्यासाठी सध्या निसर्ग प्रेमी पर्यटकांची पाऊले रामलिंग अभयारण्याकडे वळत आहेत. येथील नयनरम्य धबधबा सुरू झाल्याने पर्यटकांच्या गर्दीत मोठी वाढ होत आहे.

आणखी वाचा-रायगड जिल्ह्यातील धरणांनी गाठला तळ, ९ धरणात दहा टक्कांहून कमी पाणीसाठा

रामलिंग अभयारण्य सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर धाराशिवपासून २० तर बीडपासून ९५ किलोमीटर अंतरावर आहे. पूर्ण परिसर गर्द हिरवाईने नटलेला. दरीत उतरुन गेल्यावर समोर नव्याने जीर्णोद्धार झालेले महादेव मंदिर. मंदिराचे कोरीव बांधकाम आणि भितीवरील देवदेवतांच्या मूर्ती कोणाचेही लक्ष वेधतात. मंदिराला वळसा घालून धावणारी नदी सध्या ओसंडून वाहत आहे. या छोट्याशा नदीतील स्वच्छ नितळ पाणी पाहून प्रत्येकजण हरखून जातो. रावण व जटायूच्या युद्धात जटायू जखमी झाला. रामाने जटायूला पाणी पाजण्यासाठी इथे एक बाण मारला. त्यामुळे तिथे एक गुहा तयार झाली आणि तिथून पाण्याची धार वाहू लागली. इथेच जटायूचा मृत्यू झाला. ही समाधी जटायू पक्ष्याची आहे, अशी आख्यायिका सांगतली जाते.

आणखी वाचा-महाविकास आघाडीत बिघाडी; उद्धव ठाकरेंवर नाना पटोले नाराज? म्हणाले, “परस्पर उमेदवार…”

उन्हाळ्यात येथील धबधब्याच्या पाण्याची धार लहान होत जाते. परंतु पावसाळ्यात याच पाण्याची समुद्रासारखी गाज ऐकायला येते. हा धबधबा पाहण्यासाठी, येथील महादेवाचे आणि जटायुचे दर्शन घेण्यासाठी भक्तगण पावसाळ्यात मोठ्या संख्येने येथे येतात. अनेकवेळा श्रावण महिन्यात भाविकांची सर्वाधिक गर्दी असते. यंदा मात्र हा धबधबा मृग नक्षत्रात सुरू झाला आहे. हा परिसर हिरवागार आणि जैवविविधतेने संपन्न आहे. त्याचे रक्षण व्हावे म्हणून राज्य शासनाने १९९७ मध्ये येथील सुमारे दोन हजार हेक्टर क्षेत्र रामलिंग घाट अभयारण्य म्हणून घोषित केले आहे. धाराशिव जिल्ह्यातील अन्य पर्यटन स्थळांच्या तुलनेत रामलिंगला पर्यटकांची सर्वाधिक पसंती राहते. या अभयारण्यात पक्ष्यांच्या १०० पेक्षा अधिक विविध प्रजाती आढळतात. त्यामुळे पक्षी निरीक्षण करण्यासाठी येणार्‍या अभ्यासकांची संख्याही वरचेवर वाढत आहे. अभयारण्यात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली आहे. लागवड करण्यात आलेल्या वृक्षांव्यतिरिक्त अनेक प्रकारच्या दुर्मिळ अशा खुरट्या वनस्पती या अभयारण्यात आढळतात. त्याबरोबरच नैसर्गिकरित्या आढळून येणार्‍या खैर, धावडा, बाभुळ, सीताफळ, धामण, आपटा, हिवर, अजंन, साग, चंदन, अशा विविध प्रकारच्या वनसंपदेचे हे अभयारण्य आगारच आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ramalinga waterfall started flowing for the first time in mirga after many years mrj
Show comments