रिपब्लिकन ऐक्याच्या मुद्दय़ावर कायम मतभेद जोपासणारे रिपाइं चळवळीतील नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवले यांच्यात नक्षलवादासारख्या संवेदनशील प्रश्नावर टोकाची मतभिन्नता असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. नक्षलवाद्यांनी दलितांना जवळ करण्याचा अजेंडा राबवणे सुरू केल्याच्या पाश्र्वभूमीवर या दोन दलित नेत्यांची परस्पर विरोधी भूमिका संभ्रम निर्माण करणारी ठरली आहे.
आजवर आदिवासीबहुल भागात चळवळीचा प्रभाव निर्माण करण्यात यशस्वी ठरलेल्या नक्षलवाद्यांनी आता शहरी भागात प्रभाव निर्माण करण्यासाठी पद्धतशीर प्रयत्न सुरू केले आहेत. याच रणनीतीचा भाग म्हणून दलित समाजातील सुशिक्षित व व्यवस्था विरोध जोपासणाऱ्या तरुणांना चळवळीकडे आकर्षित करण्यासाठी सध्या नक्षलवाद्यांकडून वेगवेगळे प्रयोग राबवले जात आहेत. या प्रयोगांची चर्चा आता माध्यमांमधून रंगू लागली आहे. या पाश्र्वभूमीवर दलित समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आंबेडकर व आठवले या दोन वरिष्ठ नेत्यांची परस्पर विरोधी भूमिका अनेकांना कोडय़ात टाकणारी ठरली आहे.
रामदास आठवले यांनी दोन दिवसांपूर्वी नागपुरात बोलताना आंबेडकरवाद्यांना कधीही नक्षलवाद मान्य होऊ शकत नाही, असे विधान केले. आंबेडकरवादी जनतेचा लोकशाहीवर गाढा विश्वास असल्याने या व्यवस्थेला विरोध करणाऱ्या नक्षलवाद्यांना ही जनता स्वीकारणार नाही, अशी भूमिका त्यांनी या वेळी मांडली. केवळ हिंसेच्या मार्गातून व्यवस्था परिवर्तन होणे शक्य नसल्याने दलित युवकांनी या चळवळीपासून दूर राहावे, असे आवाहनही आठवले यांनी केले.
प्रकाश आंबेडकरांची भूमिका नेमकी याच्याविरुद्ध आहे. दहा दिवसांपूर्वी जळगावला बोलताना त्यांनी नक्षलवादी हे देशाचे शत्रू नसून मित्र आहेत, असे विधान केले होते. नक्षलवाद्यांना सरकारनेसुद्धा शत्रू समजू नये, मित्र म्हणून त्यांच्याशी चर्चा करावी, असा सल्ला आंबेडकरांनी दिला आहे. नक्षलवाद्यांचा हिंसेचा मार्ग योग्य नसला तरी त्यांच्या चळवळीविषयी आंबेडकरांना सहानुभूती असल्याचे या वक्तव्यातून स्पष्ट झाले. याच वेळी त्यांनी नक्षलवादी चळवळीच्या राज्य संघटनेचा प्रमुख असलेला मिलिंद तेलतुंबडे आपला नातेवाईक असल्याची कबुलीसुद्धा दिली होती.
दोन्ही नेत्यांच्या या परस्परविरोधी भूमिकांची चर्चा आता दलित संघटनांच्या वर्तुळात सुरू झाली आहे. वेगवेगळय़ा गटांत विभागल्या गेलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्यावरून या दोन नेत्यांमध्ये असलेले मतभेद अनेकांना ठाऊक आहेत. या पाश्र्वभूमीवर नक्षलवादासारख्या संवेदनशील मुद्दय़ावरसुद्धा या दोन्ही नेत्यांची भाषा वेगवेगळी असल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. डॉ. आंबेडकरांनी तयार केलेल्या घटनेलाच नक्षलवाद्यांचा विरोध आहे. त्याच आंबेडकरांच्या विचारधनावर आधारित भूमिका घेणारे हे दोन नेते आता वेगवेगळे बोलू लागल्याने दलित तरुणांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नक्षलवाद्यांच्या या नव्या एजेंडाच्या पाश्र्वभूमीवर दलित तरुण हा प्रश्न नेमका काय आहे हे जाणून घेण्यास उत्सुक असल्याचे नुकतेच बुद्धपौर्णिमेच्या दिवशी दीक्षाभूमीवर दिसून आले. या दिवशी दीक्षाभूमीवर धम्म आणि साम्यवाद या पुस्तकाची तडाखेबंद विक्री झाली. या पुस्तकात आंबेडकरांनी काठमांडूमध्ये केलेले भाषण व नक्षलवाद्यांचा सध्याचा एजेंडा यावर सविस्तर भाष्य करण्यात आले आहे.

नक्षलवाद्यांच्या या नव्या एजेंडाच्या पाश्र्वभूमीवर दलित तरुण हा प्रश्न नेमका काय आहे हे जाणून घेण्यास उत्सुक असल्याचे नुकतेच बुद्धपौर्णिमेच्या दिवशी दीक्षाभूमीवर दिसून आले. या दिवशी दीक्षाभूमीवर धम्म आणि साम्यवाद या पुस्तकाची तडाखेबंद विक्री झाली. या पुस्तकात आंबेडकरांनी काठमांडूमध्ये केलेले भाषण व नक्षलवाद्यांचा सध्याचा एजेंडा यावर सविस्तर भाष्य करण्यात आले आहे.