महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारला चार वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल महायुतीचा घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. आंबेडकरी जनतेचा विश्वास प्रत्यक्ष कृती करून जिंकणारा पहिला मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची नोंद करावी लागेल अशा शब्दांत रामदास आठवले यांनी आंबेडकरी जनतेसाठी केलेल्या कामाचं कौतुक केलं आहे. आंबेडकरी जनतेबरोबरच शेतकरी, कामगार, कष्टकरी, शेतमजूर यांची काळजी वाहणारे मुख्यमंत्रीही ठरले आहेत असं रामदास आठवले बोलले आहेत.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन देवेंद्र फडणवीस यांना चार वर्ष पूर्ण झाली. या चार वर्षात तरुण, अभ्यासू, उत्साही, हसतमुख आणि महाराष्ट्राच्या हितासाठी सतत नव्या निर्मितीची धडपड असणारा लोकाभिमुख मुख्यमंत्री म्हणून राज्याच्या जनमानसावर आपली मुद्रा देवेंद्र फडणवीस यांनी उमटवली असल्याचं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस सरकारची चार वर्षे ही महाराष्ट्राच्या शाश्वत प्रगतीचा पाया रचणारी ठरणार आहेत असंही ते म्हणाले आहेत.

महाराष्ट्रात अनेक गड बालेकिल्ले जिंकता येतील, मात्र कोणत्याही राजकीय योद्ध्याला आंबेडकरी जनतेचा विश्वास जिंकता येणे शक्य नसते. देवेंद्र फडणवीस यांनी हा बालेकिल्ला जिंकला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला मानणारे, आरक्षणाचे, अॅट्रॉसिटी कायद्याचे आणि संविधानाचे रक्षण करणारे दूरदृष्टी नेते आहेत असंही रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

जलयुक्त शिवार ही नवी संकल्पना आणून राज्यात जलसिंचनाची चळवळ उभारून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुशल नेतृत्व सिद्ध झाले आहे असंही ते म्हणाले आहेत.

Story img Loader