राज्यातील अनेक पक्ष हे महायुतीमध्ये किंवा महाविकास आघाडीत सहभागी झाले आहेत. परंतु, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसारखे काही पक्ष आहेत जे युती किंवा आघाडीत सामील झालेले नाहीत. एखादी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक वगळता मनसे अद्याप स्वबळावर निवडणुका लढवत आली आहे. परंतु, काही महिन्यांपूर्वी मनसे आणि भाजपाची युती होईल, अशी चर्चा सुरू होती. अलिकडेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन-तीन वेळा मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट घेतली. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही राज ठाकरे यांना भेटले. त्यामुळे मनसे-भाजपा युतीच्या चर्चा रंगू लागल्या होत्या.
मनसे, भाजपा, शिवसेना (शिंदे गट) युतीच्या चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने महायुतीत जाहीर प्रवेश केला. अजित पवार सत्तेत सहभागी झाले. ते आता उपमुख्यमंत्री म्हणून राज्याचा कारभार पाहत आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ आमदार मंत्री झाले आहेत. भाजपा-शिवसेनाप्रणित महायुतीकडे बहुमत असूनही भाजपा पक्षश्रेष्ठींनी अजित पवार आणि त्यांच्या गटाला महायुतीत समावून घेतलं आहे. त्यामुळे मनसेच्या महायुतीतल्या प्रवेशाच्या चर्चा आता मावळल्या आहेत.
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीत सामील होईल का? यावर केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) अध्यक्ष रामदास आठवले यांनी भाष्य केलं आहे. रामदास आठवले आज (२४ ऑगस्ट) पंढरपूर दौऱ्यावर आले आहेत. पंढरपुरात आरपीआयचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी आठवले यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली.
हे ही वाचा >> “…म्हणून आम्ही दक्षिण ध्रुव निवडला”, इस्रो प्रमुखांनी सांगितलं Chandrayaan 3 मोहिमेचं मुख्य उद्दिष्ट
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष महायुतीत सहभागी होतील का? असा प्रश्न यावेळी पत्रकारांनी आठवले यांना विचारला. त्यावर आठवले म्हणाले, हा राज ठाकरे यांचा आणि भाजपाचा विषय आहे. त्यांनी महायुतीत यायचं की नाही हे त्यांनी स्वतः ठरवायचं आहे. यावेळी मनसेचे स्थानिक नेते दिलीप (बापू) धोत्रे हे आठवले यांच्या शेजारी उभे होते. रामदास आठवले दिलीप धोत्रे यांच्याकडे पाहून म्हणाले, त्यासाठी (मनसे – भाजपा युतीसाठी) बापू प्रयत्न करतील.