केंद्रीय मंत्री आणि भारतीय रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) प्रमुख रामदास आठवले यांनी भारतातील मुस्लीम समुदायाविषयी मोठं विधान केलं आहे. भारतातील सर्व मुस्लीम आधी हिंदूच होते आणि ते सर्व हिंदू होण्यापूर्वी बौद्ध होते, असा दावा रामदास आठवले यांनी केला आहे. ते अहमदनगरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
“भारतातील सर्व मुस्लीम हिंदू होते आणि त्याआधी ते बौद्ध होते”
रामदास आठवले म्हणाले, “औरंगजेब इथला नाही. भारतातील सर्व मुसलमान पूर्वी हिंदूच होते. ते हिंदू होण्यापूर्वी सर्वजण बौद्ध होते. बौद्ध होण्यापूर्वी सर्व वैदिक होते. त्यामुळे हे बाहेरून आलेले मुसलमान नाहीत. म्हणूनच हिंदूंनी मुसलमानांना समजून घेणं आवश्यक आहे आणि मुसलमानांनीही हिंदू समाजाच्या भावना लक्षात घेणं आवश्यक आहे.”
हेही वाचा : “संभाजी महाराजांच्या हत्येत हिंदुंचाही सहभाग”, थेट इतिहासाचा दाखला देत प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान!
“औरंगजेबाचा उदोउदो करण्याची भूमिका योग्य नाही”
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट देऊन फुलं वाहिल्यावरून रामदास आठवले यांनी टीका केली. रामदास आठवले म्हणाले, “औरंगजेबाचा उदोउदो करण्याची भूमिका योग्य नाही. प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट देणं आमच्या दलित समाजाला आवडलेलं नाही. मुस्लीम समाजातील तरुणांनीही औरंगजेबाचा उदोउदो करून हिंदू समाजात जाणीवपूर्वक रोष निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. आम्ही मुस्लिमांविरोधात अजिबात नाही. त्यामुळे मुद्दाम काहीतरी खोड काढण्याचा प्रयत्न कुणी करू नये. “
“मागील निवडणुकीत भाजपाला ८ टक्के मुस्लीम मतं”
“आमचं सर्व मुस्लिमांना हेच सांगणं आहे की, काँग्रेसवाले आणि विरोधीपक्षावाले तुम्हाला भडकावत आहेत. त्यामुळे मुस्लिमांनी त्यांचं ऐकू नये. मुस्लिमांनी आमच्याबरोबर राहिलं पाहिजे. मागील निवडणुकीचा सर्व्हे आहे की, जवळपास ८ टक्के मुसलमानांची मतं भाजपाला मिळाली होती. आता पुढील निवडणुकीत आमचं आवाहन आहे की, तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही खंबीर आहोत. मुस्लीम समाजाने आम्हाला पाठिंबा दिला पाहिजे,” असं मत रामदास आठवलेंनी व्यक्त केलं.
हेही वाचा : औरंगजेब वाद : जिन्नाहच्या कबरीवर आडवाणींनी डोकं का टेकलं होतं? उद्धव ठाकरेंचा प्रश्न
“अशा दंगली महाराष्ट्रात आणि इतरत्र होऊ नये”
“भाजपाचा मुस्लीम विभाग (विंग) आहे आणि माझ्या पक्षाचाही मुस्लीम विभाग आहे. आम्ही आमच्या पक्षात मुस्लिमांना आणण्याचा मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करतो आहोत. त्यामुळे अशा दंगली महाराष्ट्रात आणि इतरत्र होऊ नये. तसेच विनाकारण कुणीही वाद निर्माण करू नये असं माझं मत आहे,” असंही रामदास आठवलेंनी नमूद केलं.