रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) अध्यक्ष रामदास आठवलेंनी शिवसेनेच्या (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारेंवर प्रतिक्रिया दिली. “सुषमा अंधारे आधी माझ्या पक्षातही होत्या, पण सध्या शिवसेनेत नेत्यांची कमी आहे. त्यामुळे त्यांना शिवसेनेत उपनेतेपद दिलं आहे,” असं म्हणत त्यांनी टोला लगावला. ते शुक्रवारी (९ डिसेंबर) कल्याणमध्ये माध्यमांशी बोलत होते.
रामदास आठवले म्हणाले, “शिवसेनेनं सुषमा अंधारेंना टीका करण्यासाठीच आणलं आहे. अंधारे आमच्याही पक्षात होत्या, पण आता त्या शिवसेनेत गेल्या आहेत. त्या तशा फरड्या, संघर्षशील वक्त्या आहेत. त्या काही वर्षे माझ्या पक्षात होत्या, पण सध्या शिवसेनेत नेत्यांची कमी आहे. त्यामुळे त्यांना उपनेतेपद दिलं आहे.”
“सुषमा अंधारे टीका करण्यात ‘एक्सपर्ट’ आहेत”
“सुषमा अंधारे या टीका करण्यात ‘एक्सपर्ट’ आहेत. त्यांनी सारखी टीका करू नये. टीका करायला हरकत नाही, पण सारखी टीका करू नये,” असं म्हणत आठवलेंनी अंधारेंना टोला लगावला.
व्हिडीओ पाहा :
“अलीकडे महाराष्ट्रात असंतोष पाहायला मिळत आहे”
सीमावादावर बोलताना रामदास आठवले म्हणाले, “मराठी भाषिकांना महाराष्ट्रात घ्यावं ही आपली सुरुवातीपासूनची भूमिका आहे. त्याबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी होईलच, पण अलीकडे महाराष्ट्रात असंतोष पाहायला मिळत आहे. कुणी कर्नाटकमध्ये, कुणी तेलंगणामध्ये, तर कुणी आम्हाला गुजरातमध्ये जायचं असल्याचं म्हणत आहेत.”
“ही परिस्थिती महाराष्ट्रासाठी फारशी भूषणावह नाही”
“ही परिस्थिती महाराष्ट्रासाठी फारशी भूषणावह नाही. या सीमावर्ती लोकांकडे अनेक वर्ष लक्ष दिलं गेलं नाही. त्यांना प्यायला पाणी मिळत नाही. यापूर्वीच्या सरकारनं त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही,” असा आरोप रामदास आठवले यांनी केला.
हेही वाचा : “तुमच्या पक्षाचा एकही सदस्य लोकसभेत नाही तरी तुम्ही मंत्री कसे?” रामदास आठवलेंनी दिलं उत्तर, म्हणाले…
“शिंदे फडणवीस सरकारकडून सीमा भागासाठी २ हजार कोटींची घोषणा”
“असं असलं तरी शिंदे फडणवीस सरकारनं या भागासाठी २ हजार कोटींची घोषणा केली आहे. म्हैसाळ योजनेतून या गावांना पाणी मिळणार असून या भागाचा विकास होणं महत्त्वाचं आहे. या लोकांना इंडस्ट्री, शेती आणि पिण्यासाठी पाणी, रोजगार देणं गरजेचं आहे, या गावांकडे सरकारनं विशेष लक्ष द्यावं, अशी मागणी मी सरकारकडे करणार आहे. कुठल्याही गावानं हतबल होऊन राज्य सोडून जाऊ नये, याची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे,” असं मत रामदास आठवलेंनी व्यक्त केलं.