राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर कोरेगाव-भीमा दंगल व्यवस्थित हाताळली नाही, असा गंभीर आरोप केला. त्यांच्या या आरोपावर केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) प्रमुख रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिलीय. “देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने दंगल हाताळली आणि महाराष्ट्रात इतर कोणत्याही जिल्ह्यात दंगल होऊ दिली नाही,” असं मत रामदास आठवले यांनी व्यक्त केलं. ते सांगलीत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत होते.
रामदास आठवले म्हणाले, “शरद पवार यांच्या मताशी मी सहमत नाही. देवेंद्र फडणवीस यांनी दंगल चांगल्या पद्धतीने हाताळली होती. त्यांनी महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात दंगल होऊ दिली नाही. भाजपा सरकारने दंगल वाढवण्याचा विषय अजिबात येत नाही. कारण सरकार भाजपाचं असलं तरी दंगल करणारे भाजपाचे नव्हते. दंगल करणारे सर्व लोक स्थानिक होते.”
“दंगल करणाऱ्यांमध्ये राष्ट्रवादी, काँग्रेस आणि इतरही पक्षातील तरुण”
“दंगल करणाऱ्यांमध्ये राष्ट्रवादी, काँग्रेस आणि इतरही पक्षातील तरुण होते. तेव्हा झालेली दंगल वडू गावातील घटनेमुळे झाली होती. ती दंगल व्यवस्थित हाताळली नाही असंही नाही. ही दंगल एका दिवसात १-२ तासांचीच होती. त्यानंतर महाराष्ट्रात कुठलीही दंगल घडली नाही. त्यामुळे शरद पवारांच्या मताशी मी सहमत नाही,” असं रामदास आठवले यांनी सांगितलं.
हेही वाचा : भीमा-कोरेगाव दंगल प्रकरणी संभाजी भिडेंवर कारवाई व्हायलाच पाहिजे, रामदास आठवलेंची मागणी
“फडणवीस यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने दंगल हाताळली”
“देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने दंगल हाताळली होती. तसेच महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात दंगल होऊ दिली नाही. ही चांगली कामगिरी फडणवीसांनी केली,” असंही आठवलेंनी नमूद केलं.