अकोला : “विधान परिषद निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा विजय झाला, तर ठाकरे सरकारला कुठेही तोंड दाखवायला जागा राहणार नाही. भाजपाचा विजय झाल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा,” अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली. अकोल्यात एका विवाह समारंभात आले असताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) अकोला महापालिकेसह राज्यातील आगामी महापालिका निवडणूका लढणार असल्याचीही घोषणा केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रामदास आठवले म्हणाले, “महाविकासआघाडीने दावा केला असला तरी आमचाही दावा आहे की आमच्या सर्व जागा निवडून येतील. कोणत्याही परिस्थितीत आमची पाचवी जागा निवडून येईन.”

“आम्हाला अपक्षांचाही पाठिंबा मिळतो आहे.छोट्या मोठ्या पक्षांचाही पाठिंबा मिळतो आहे आणि आमच्याकडे देखील मतं आहेत. त्यामुळे भाजपाला राज्यसभेप्रमाणे विधान परिषद निवडणुकीत देखील यश मिळणार आहे,” असं मत रामदास आठवले यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा : राज्यसभा निवडणूक : भाजपाच्या विजयानंतर रामदास आठवलेंची शिवसेनेवर टीका, म्हणाले ‘बड्या बड्या वाघांची…’

“भाजपाची ही जागा निवडून आली, तर महाविकासआघाडीला तोंड दाखवायला जागा राहणार नाही. ही निवडणूक हरल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा, अशी आमची मागणी राहणार आहे,” असंही रामदास आठवले यांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ramdas athawale criticize mva government over mlc election in akola pbs