Dvendra Fadnavis Government : राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर तब्बल ११ दिवसांनी भाजपाचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असल्याचे आता निश्चित झाले आहे. आज भाजपाच्या नवनिर्वाचित आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळ पक्षनेता म्हणून निवड केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यानंतर देवेंद्र फडणवीस यांचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अभिनंदन केले. याचबरोबर महायुतीचा घटक असल्यामुळे रामदास आठवले यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियालाही (आठवले) मंत्रिमंडळात स्थान द्यावे अशी मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली आहे.

काय म्हणाले रामदास आठवले?

दिल्लीत सध्या संसदेचे अधिवेशन चालू आहे. यावेळी एएनआयशी बोलताना रामदास आठवले म्हणाले, “भाजपाच्या विधीमंडळ नेतेपदी निवड झाल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन. फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणून कामाचा मोठा अनुभव आहे. ते एक सक्रिय कार्यकर्ते आहेत. त्यामुळे ते उत्तम काम करतील. मी नुकतेच अमित शाह यांची भेट घेत त्यांना सांगितले आहे की, या निवडणुकीत महायुतीला दलितांनी मोठ्या प्रमाणात मतदान केले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आरपीआयलाही स्थान मिळायला हवे. अमित शाह यांनी यावर विचार करतो असा शब्द दिला आहे.”

मुख्यमंत्रीपदावरून रस्सीखेच

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू होती. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपद पाहिजे यासाठी अडून बसल्याच्या चर्चा होत्या. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह जो निर्णय घेतील तो मान्य असल्याचे म्हटले होते. याच दरम्यान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ५ डिसेंबर रोजी महायुती सरकारचा शपथविधी होणार असल्याचे जाहीर केले होते. दुसरीकडे अजित पवार यांनी निकाल लागल्यानंतरच मुख्यमंत्रीपदासाठी भाजपाला आपला पाठिंबा दर्शवला होता.

हे ही वाचा : एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार का? उदय सामंत यांनी दिलं उत्तर; म्हणाले, “त्यांनी…”

महायुतीचा मोठा विजय

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने प्रचंड मोठा विजय मिळवत २३० हून अधिक जागा जिंकल्या. यामध्ये भाजपाने १३२ जागांवर विजय मिळवला तर, शिवसेना (एकनाथ शिंदे) ५७ आणि राष्ट्रवादीने (शरद पवार) ४१ जागा जिंकल्या. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत महायुतीचा धुव्वा उडवणाऱ्या महाविकास आघाडीच्या वाट्याला अवघ्या ४९ जागाच आल्या. लोकसभा निवडणुकीत जसे यश मिळाले तसेच यश विधानसभा निवडणुकीतही मिळेल अशी आशा महाविकास आघाडीला होती. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीवर महायुती वरचढ ठरल्याचे पाहायला मिळाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ramdas athawale demands ministership for rpi in devendra fadnavis government amit shah aam