Ramdas Athawale : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी राज्यसभेत बोलताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या एका विधानावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यावरून इंडिया आघाडीने रान उठवलं आहे. विरोधकांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. दरम्यान, यानंतर अमित शाह यांनी पत्रकार परिषद घेत यासंदर्भात स्पष्टीकरण देत माझ्या विधानाचा विपर्यास केल्याचं सांगत काँग्रेसवर जोरदार टीका केली. यावरून आता राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, गृहमंत्री अमित शाह यांच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासंदर्भातील विधानावर आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली. ‘काँग्रेस जाणूनबुजून काही ना काही विषय काढून सभागृहाचं काम रोखण्याचा प्रयत्न करत आहे’, असं रामदास आठवले यांनी म्हटलं.

रामदास आठवले काय म्हणाले?

अमित शाह यांच्या राज्यसभेतील भाषणासंदर्भात बोलताना रामदास आठवले म्हणाले, “मला वाटतं की काँग्रेस पक्षाला कोणतीही टिप्पणी करण्याचा अधिकार नाही. अमित शाह हे राज्यसभेत संविधानाबाबत सांगत होते. त्यांच्या बोलण्याचा अर्थ असा होता की काँग्रेस पक्षाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा दोनदा पराभव केला होता. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना काँग्रेसमुळे कायदामंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. काँग्रेसने केंद्रात सरकार असताना त्यांची प्रतिमा देखील लावली नव्हती. काँग्रेसचे लोक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करणारे आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करण्याचं काम काँग्रेसने केलं हे सांगण्याचा अमित शाह यांचा हेतू होता. अमित शाह यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत आदर आहे. यामध्ये कुठेही अपमान करण्याचा हेतू नव्हता. मात्र, काँग्रेस जाणूनबुजून काही ना काही विषय काढून सभागृहाचं काम रोखण्याचा प्रयत्न करत आहे”, असं रामदास आठवले यांनी म्हटलं.

हेही वाचा : Uddhav Thackeray : ‘काँग्रेसनेही बाबासाहेबांचा अपमान केला’ विचारताच उद्धव ठाकरे म्हणाले, “दुसऱ्याने शेण खाल्लं…

अमित शाह यांनी काय स्पष्टीकरण दिलं?

लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांत संविधानाला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल संविधानावर चर्चा झाली. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत भाषण केलं. मात्र, अमित शाह यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला. यावर स्पष्टीकरण देताना अमित शाह यांनी म्हटलं की, “जेव्हा संसदेत चर्चा होते, तेव्हा एक गोष्ट महत्त्वाची असते. जे काही मांडलं जाईल त्याला आधार हवा, तथ्य हवं. पण काँग्रेसने सोमवारपासून वास्तवाची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. ही बाब निषेधार्ह आहे. मी याचा तीव्र निषेध करतो. काँग्रेस पक्ष हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विरोध करणारा पक्ष आहे, संविधान विरोधी पक्ष आहे. काँग्रेस पक्षाने वीर सावरकरांचाही अपमान केला. काँग्रेसने आणीबाणी लादून संविधानाची लक्तरं केली. स्त्रियांच्या सन्मानासारखा विषय त्यांनी बाजूला फेकला होता. न्याय व्यवस्थेचा अपमान केला, शहिदांचा अपमान केला. भारताची भूमी तोडण्याचं काम काँग्रेसने केलं. हे सगळं सत्य देशासमोर आलं तेव्हापासून काँग्रेसने पु्न्हा एकदा गोष्टी तोडफोड करुन आणि सत्य असत्याप्रमाणे सांगण्याचा काम केलं”, असं म्हणत अमित शाह यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.

Story img Loader