Ramdas Athawale On Maharashtra Cabinet Expansion: महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं. महायुतीने २८८ पैकी तब्बल २३५ जागा जिंकल्या. त्यानंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं. ५ डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर आज (१५ डिसेंबर रोजी) महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. आज झालेल्या मंत्रिमंडळात ३३ कॅबिनेट मंत्री आणि ६ राज्यमंत्री असणार आहे. मात्र, या मंत्रिमंडळात रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाला संधी मिळाली नाही. यावरून रामदास आठवले यांनी महायुतीवर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. “मी नाराज आहे आणि माझे कार्यकर्तेही नाराज आहे”, असं रामदास आठवले यांनी म्हटलं.
रामदास आठवले काय म्हणाले?
“महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज नागपूरमध्ये पार पडला. या सोहळ्याला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते. मात्र, महायुतीचा एक भाग असूनही शपथविधीचं मला निमंत्रण देखील आलं नाही. मग जेव्हा निवडणुका असतात, तेव्हा मला सगळीकडे नेलं जातं. आता शपथविधीसाठी मला निमंत्रणही मिळालं नाही. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी केली. आमचा समाज मोठ्या संख्यने भाजपाबरोबर राहिला. तरीही लोकसभेच्या निवडणुकीत एकही जागा रिपब्लिकन पार्टीला दिली नव्हती. विधानसभेच्या निवडणुकीतही एकही जागा आम्हाला दिली नाही”, असं रामदास आठवले यांनी म्हटलं.
#WATCH | Mumbai, Maharashtra | Union Minister Ramdas Athawale says, "The swearing-in ceremony of ministers in the Maharashtra cabinet expansion is being organised in Nagpur. CM and DCMs are attending the ceremony there. Despite being a part of Mahayuti, I did not even get the… pic.twitter.com/8kXdLjeaGT
— ANI (@ANI) December 15, 2024
हेही वाचा : फडणवीसांच्या मंत्रिमंडळात भाजपाचे एकूण २० मंत्री, तीन महिलांसह तीन राज्यमंत्री, वाचा संपूर्ण यादी
“आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठका घेतल्या होत्या, त्यांनी आम्हाला किमान एक विधानपरिषदेची जागा देण्याचं आश्वासन दिलं होतं. तसेच एक मंत्रिपद देण्याचं आश्वासन दिलं होतं. पण या मंत्रिमंडळात रिपब्लिकन पार्टीचा एकही चेहऱ्याला संधी मिळाली नाही. तसेच गेल्या अडीच वर्षांच्या सरकामध्येही आमच्या पक्षाचा एकही मंत्री नव्हता. मला वाटतं की राज्यातील गावागावत आमचे कार्यकर्ते आहेत. पण आता त्यांना कसं तोंड द्यायचं हा माझ्यापुढे प्रश्न आहे”, असं रामदास आठवले यांनी म्हटलं.
‘मी आणि माझे कार्यकर्तेही नाराज’
“केंद्रात मला एक मंत्रिपद मिळालं. पण ज्या कार्यकर्त्यांनी मला मंत्रिपदापर्यंत पोहोचवलं त्या कार्यकर्त्यांनाही सत्तेत भागेदारी मिळाली पाहिजे. याबाबत मी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली होती. तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की यावेळी संधी दिली जाईल. कालपर्यंत आम्ही वाट पाहिली. पण आमच्या आरपीआयचा मंत्री करण्यासंदर्भात आम्हाला कोणता फोन आला नाही. त्यामुळे मी नाराज आहे आणि माझे कार्यकर्तेही नाराज आहे. भाजपाने रिपब्लिकन पार्टीकडे दुर्लक्ष करणं हे योग्य नाही. याबाबत आमची नाराजी आहे. आमची मागणी आहे की आता जे दोन मंत्रिपदे राहिले आहेत, त्यासाठी तरी रिपब्लिकन पार्टीचा विचार केला पाहिजे. पण आमच्या पक्षाला का टाळलं जातं? हे समजत नाही”, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.