केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्ये सामील होण्याचं आमंत्रण दिलं आहे. शरद पवार यांनी विनाकारण काँग्रेस आणि राहुल गांधींच्या नादी लागून देशाचं नुकसान करू नये. त्यांनी एनडीएमध्ये सामील होण्यास काहीही हरकत नाही. त्यांना आमचं आमंत्रण आहे, अशा शब्दांत रामदास आठवले यांनी शरद पवारांना आमंत्रण दिलं आहे.
शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यात गुप्त भेट घेतली होती. या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. शरद पवारही लवकरच भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्ये सामील होतील, अशी चर्चा सुरू होती. याबाबत विचारलं असता रामदास आठवले म्हणाले, “शरद पवार एनडीएबरोबर येतील, असं वाटत नाही. पण शरद पवारांनी एनडीएबरोबर आलं पाहिजे. त्यांचे ५४ आमदार होते. त्यातले जवळजवळ ४३-४४ आमदार अजित पवारांबरोबर आले आहेत. त्यामुळे शरद पवारांनीही देशाच्या हितासाठी देशाचा विकास करण्यासाठी नरेंद्र मोदी यांच्याबरोबर येणं अत्यंत आवश्यक आहे.”
हेही वाचा- “जखम डोक्याला अन्…”, ‘कांदा’ प्रश्नावरून आमदार रोहित पवारांचा देवेंद्र फडणविसांना टोला
“अजित पवारांच्या भेटीवर शरद पवार म्हणतायत की ती वैयक्तिक आणि कौटुंबीक भेट होती. त्यामुळे त्या भेटीत काय चर्चा झाली? हे मला माहीत नाही. पण शरद पवारांनी एनडीएमध्ये येण्याबाबत विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. मीसुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर होतो. आता मीही भाजपा आणि एनडीएसोबत आलो आहे. राजकारणात अशा युती होत असतात. अशावेळी वैचारीक मतभेद असू शकतात. पण कॉमन मिनिमम अजेंड्यावर सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे. यावरच आम्ही एनडीएचे लोक एकत्र आलो आहोत. त्यामुळे शरद पवारांनीही एनडीएमध्ये यायला हरकत नाही. त्यांना आमचं निमंत्रण आहे. त्यांनी महाराष्ट्र आणि देशाच्या विकासासाठी एनडीएबरोबर आलं पाहिजे. त्यांनी काँग्रेस आणि राहुल गांधींच्या नादी लागून विनाकारण देशाचं नुकसान करू नये, असं माझं मत आहे,” असंही रामदास आठवले म्हणाले. ते नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.