वाई: महायुतीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची ज्याप्रमाणे चर्चा होते, तशी आरपीआयची चर्चा होत नाही, अशी खंत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी साताऱ्यात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.साताऱ्यात रिपाइं आठवले गटाच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराच्या निमित्ताने केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे आले होते. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. आठवले म्हणाले लोकसभा आणि विधानसभेच्या अनुषंगाने मागच्या वेळी भाजपच्या चिन्हावर आमचे पाच उमेदवार उभे होते. त्यापैकी दोन उमेदवार निवडून आले. परंतु आता लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत भाजपच्या चिन्हावर उभे राहणे योग्य नाही. मी तीनवेळा जेव्हा काँग्रेसच्या आघडीबरोबर निवडून आलो. तेव्हा रिपाइंच्या चिन्हावर निवडून आलो. त्यामुळे यावेळी दोन लोकसभा आणि दहा विधानसभेच्या जागा मिळाव्यात, हा आमचा प्रयत्न असेल. रिपाइंचे सहा आमदार निवडून येतील.
तशी आमची बांधणी सुरू आहे. सर्व घटकपक्षांशी एकत्र बसून आम्ही चर्चा करू. दलित मतांची निवडून येण्याची नितांत आवश्यकता आहे. महराष्ट्रातील माझा गट प्रभावी आहे. त्यामुळे महायुतीने दलित मतांना बरोबर घेण्यासाठी रिपाइंला डावलून चालणार नाही. महायुतीतील सर्व नेत्यांना आवाहन आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची ज्याप्रमाणे चर्चा होते तशी रिपाइंची चर्चा होत नाही. रिपाइला सोबत घेतल्याशिवाय सत्ता आणणे अशक्य आहे, ही भावना लक्षात घेऊन महायुतीच्या नेत्यांनी रिपाइंकडे दुर्लक्ष करू नये. शिर्डी लोकसभा मतदारसंघाबाबत सूचक वक्तव्य करत २००९ मध्ये माझा शिर्डी लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला होता. यावेळी शिर्डी लोकसभा मतदारसंघात अनेक नेते मंडळी भाजपमध्ये आले आहेत. त्यामुळे मी पुन्हा शिर्डी मधून इच्छुक असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. माझी २०२६ पर्यंत राज्यसभा असल्यामुळे शिर्डीची जनता मला स्वीकारेल, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.