लोकसभा निवडणूक पार पडून आता विविध पक्ष विधानसभेच्या कामाला लागले आहेत. महायुतीने देखील लोकसभेचं अपयश विसरून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीकडे लक्ष वळवलं आहे. अशातच महायुतीमधील घटकपक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने महायुतीत त्यांना मागील निवडणुकीपेक्षा अधिक जागा मिळाव्यात अशी मागणी केली आहे. आरपीआयचे (आठवले गट) प्रमुख रामदास आठवले म्हणाले, “काही दिवसांपूर्वी आमची उपमुख्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रातील वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी जागावाटपावर चर्चा झाली होती. त्यावेळी आम्ही त्यांना म्हणालो होतो की लोकसभा निवडणुकीत आम्हाला एकही जागा मिळाली नाही. त्यामुळे आम्हाला महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत आठ ते दहा जागा हव्या आहेत. मला मान्य आहे की महायुतीत भाजपाबरोबर अनेक मित्र पक्ष आहेत. परंतु, आमची आठ ते दहा जागांची मागणी आहे.”
रामदास आठवले म्हणाले, “महायुतीत एकनाथ शिंदेंचा पक्ष, अजित पवारांचा पक्ष, आरपीआय, महादेव जानकरांचा पक्ष, सदाभाऊ खोत आणि विनय कोरे यांचे पक्ष देखील आहेत. त्यात आरपीआयला आठ ते दहा जागा मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे. यामध्ये कमी-जास्त होऊ शकतं. परंतु, सुरुवातीच्या टप्प्यात आम्ही आठ ते दहा जागांची मागणी केली आहे.”
आरपीआयचे प्रमुख म्हणाले, “लोकसभा निवडणुकीत आम्हाला उमेदवारी मिळाली नाही. परंतु, आम्ही ठरवलं आहे की विधानसभेच्या काही जागा लढायच्या आणि त्या निवडून आणायच्या. आम्ही तसा निर्धार केला आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपयश आलं असलं तरी त्याची अन्य काही कारणं होती. महाविकास आघाडीवाल्या लोकांनी जनतेला ब्लॅकमेल केलं, संविधानाबाबत अफवा पसरवून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला. त्याचा आम्हाला फटका बसला. परंतु, विधानसभा निवडणुकीत आम्ही या गोष्टीची काळजी घेऊ. दलित आणि मुस्लिमांमधील नाराजी दूर करू, त्यांच्यातील गैरसमज दूर करून त्यांना आमच्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करू.”
हे ही वाचा >> “भाजपावरील नाराजीचा आम्हाला फटका”, अजित पवार गटाचं वक्तव्य; महायुतीत बिनसलं? RSS चा उल्लेख करत म्हणाले…
आठवले म्हणाले, ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, ही भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. तर दुसऱ्या बाजूला मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे मराठा, ओबीसी आणि दलितांबरोबर आदिवासी समाज देखील आमच्याबरोबर असेल. अल्पसंख्याकांनाही आमच्या बरोबर घेऊन आम्ही आगामी विधानसभा निवडणुकीत १७० ते १८० जागा निवडून आणण्याचा निर्धार केला आहे. नरेंद्र मोदींनी मागील १० वर्षांत केलेला विकास, महाराष्ट्रात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी केलेल्या कामांचा लेखाजोखा आम्ही लोकांसमोर घेऊन जाणार आहोत. त्यामुळे आम्हाला विधानसभा निवडणुकीत चांगलं यश मिळेल.