Ramdas Athawale : महायुतीत राज ठाकरे यांनी येऊ नये असं परखड मत महायुतीच्याच एका बड्या नेत्याने व्यक्त केलं आहे. महायुतीला निवडणुकीत प्रचंड यश मिळालं आहे. ज्यानंतर राज ठाकरे हेदेखील महापालिका निवडणुकीच्या आधी महायुतीशी हातमिळवणी होईल अशी चर्चा आहे. उदय सामंत यांनीही राज ठाकरेंची शनिवारी भेट घेतली. तसंच काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील राज ठाकरेंच्या भेटीसाठी गेले होते. यानंतर आता आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी राज ठाकरेंना बरोबर घेऊ नये असं परखड मत व्यक्त केलं आहे.
रामदास आठवले काय म्हणाले?
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कधी युती होते कधी होत नाही. पूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र निवडणुका लढायचे. आता महाविकास आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आहे. मात्र हे तीन पक्षही एकत्र निवडणूक लढतील असं वाटत नाही. महायुतीने एकत्र निवडणूक लढवली पाहिजे अशी आमची भूमिका आहे. असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.
आम्हाला १० ते १२ जागा मिळाल्या पाहिजेत ही अपेक्षा आहे-आठवले
आगामी महापालिका निवडणुकांमध्ये १० ते १२ जागा आम्हाला मिळाल्या पाहिजेत अशी आमची मागणी आहे असं रामदास आठवले म्हणाले. आम्हाला लोकसभा निवडणूक, विधानसभा निवडणूक यात एकही जागा मिळालेली नाही त्यामुळे आमची ही अपेक्षा आहे. तसंच नवी महामंडळं स्थापन केली जातील त्यातील तीन अध्यक्षपदं तरी आम्हाला मिळाली पाहिजेत अशीही मागणी रामदास आठवलेंनी केली.
राज ठाकरेंना महायुतीत घेऊ नये कारण…
राज ठाकरे हे आमचे चांगले मित्र आहेत. त्यांना महायुतीबरोबर घ्यायचं वगैरे चर्चा सुरु आहेत. पण त्यांना घेऊ नये असं आमचं मत आहे. आरपीआय असताना राज ठाकरेंची आवश्यकता नाही असं आमचं स्पष्ट मत आहे. आम्हाला आत्ताच काही मिळत नाही राज ठाकरे आल्यावर काहीच मिळणार नाही. लोकसभेत त्यांचा काही फारसा फायदा आम्हाला झालेला नाही. राज ठाकरेंच्या घरी मुख्यमंत्र्यांनी जाणं अयोग्य आहे असं नाही पण मला वाटतं की राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटायला आलं पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंच्या निवासस्थानी सारखं जाणं काही योग्य नाही असंही रामदास आठवलेंनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात महायुतीची ताकद वाढली आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देश पुढे जात आहे याचा आम्हाला आनंद आहे असंही आठवले यांनी म्हटलं आहे.