Ramdas Athawale Appeal Prakash Ambedkar to join NDA : रीपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले हे गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) आहेत. तसेच ते गेल्या आठ वर्षांपासून केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री देखील आहेत. आठवलेंचा पक्ष हा बहुजन समाजाचं प्रतिनिधित्व करणारा एनडीएतील प्रमुख पक्ष आहे. दरम्यान, आठवले यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांना एनडीएत सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. विशेष म्हणजे प्रकाश आंबेडकरांसाठी आठवले यांनी केंद्रीय मंत्रिपद सोडण्याची तयारी देखील दर्शववली आहे.
रामदास आठवले म्हणाले, “वंचित बहुजन आघाडीने थोडा सकारात्मक विचार करणं आवश्यक आहे. वंचितने महायुतीत (एनडीए) येणं आवश्यक आहे, त्यांना माझं निमंत्रण आहे. ते महायुतीत आले तर त्यांना सत्तेचा फायदा होईल. ते आले तर मला मंत्री नाही केलं तरी चालेल, प्रकाश आंबेडकर यांना मंत्री करा अशी मागणी मी स्वतः करेन”.
“महायुतीमधील गळतीचा बारकाईने अभ्यास करू”
दरम्यान, महायुतीतील काही नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटात जाणार असल्याची चर्चा चालू आहे. त्यावर आठवले म्हणाले, “ज्यांना विधानसभा निवडणुकीचं तिकीट मिळेल याची खात्री नाही ते शरद पवार यांच्याकडे जात आहेत. आम्ही याचा अत्यंत बारकाईने अभ्यास करत आहोत”.
एक राष्ट्र एक निवडणूक कार्यक्रमावर आठवलेंची भूमिका स्पष्ट
केंद्र सरकार एक राष्ट्र एक निवडणूक या कार्यक्रमावर जोर देत आहे. तर विरोधकांनी त्यास विरोध दर्शवला आहे. यावर रामदास आठवले म्हणाले, “पूर्वी वन नेशन वन इलेक्शन अशी प्रणाली होती. संविधानात अशी तरतूद होती. सुरुवातीला काही निवडणूका अशाच झाल्या आहेत. त्यामुळे देशाचा फायदा होणार आहे, हा काही हुकूमशाही आणण्याचा विषय नाही. या विधेयकाला माझ्या पक्षाचा पाठींबा आहे”.
हे ही वाचा >> Devendra Fadnavis : “उद्योग महाराष्ट्राबाहेर जाणं हा विरोधकांचा अपप्रचार, ते आता तोंडावर पडलेत”, ‘रीन्यू पॉवर’च्या नि
विधानसभेला महायुतीकडे आरपीआयसाठी १८ जागा मागणार : रामदास आठवले
“विधानसभा निवडणुकीत आम्ही महायुतीकडे १० ते १२ जागा मागणार आहोत, असं रामदास आठवले यावेळी सांगितलं. ते म्हणाले, विधानसभेला आम्हाला भाजपाच्या कोट्यातून १० ते १२ जागा मिळाव्यात आणि सरकार आलं तर आम्हाला १ ते २ मंत्रिपदे मिळावित, महामंडळं मिळावित अशी अपेक्षा आहे. विधानसभेत आरपीआयचा विचार करावा, आम्हाला डावलू नये, याबाबत मी देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी आम्हाला भाजपाच्या कोट्यातील समजू नये, तिघांनी मिळून जागा द्यावात. २३ सप्टेंबर रोजी आमचं शिष्टमंडळ भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटणार आहे. त्यावेळी आम्ही १८ जागांची मागणी करणार आहोत. त्यापैकी किमान १० ते १२ जागा मिळाव्यात अशी आमची मागणी आहे”, असं आठवले म्हणाले.