Ramdas Athawale On Raj Thackeray : विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत बोलताना राज ठाकरे यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती बरोबर घेण्यासंदर्भात सूचक विधान केलं होतं. तसेच जिथे जिथे शक्य असेल तिथे राज ठाकरेंना बरोबर घेऊ, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं.
यानंतर आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महायुतीत घेण्यास विरोध केला आहे. तसेच राज ठाकरेंचा महायुतीला फायदा होणार नाही, तसेच मी असताना राज ठाकरेंची महायुतीत गरज काय? असा सवाल करत रामदास आठवले यांनी राज ठाकरे यांची चांगलीच फिरकी घेतली. ते नाशिकमधील पत्रकार परिषदेत बोलत होते.
रामदास आठवले काय म्हणाले?
विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भात बोलताना रामदास आठवले यांनी म्हटलं की, “माझ्याकडे जवळपास शंभर लोकांची नावं आली होती. आम्ही म्हणत होतो की आम्हाला १० ते १२ जागा द्या. पण तेव्हा १० ते १२ जागा मिळणं अशक्य आहे असं मला वाटलं तेव्हा मी म्हटलं की आम्हाला ४ ते ५ जागा द्या. आम्ही महायुतीला सोडणार नाही. आता लोकसभेच्या निवडणुकीवेळी महादेव जानकर हे शरद पवारांना भेटून आले आणि लगेच त्यांना महायुतीत परभणीची जागा सोडली. मग मी शरद पवार यांना भेटलो असतो तर मलाही शिर्डीची जागा महायुतीत मिळाली असती. पण मी तसं केलं नाही”, असं रामदास आठवले यांनी म्हटलं.
रिपब्लिकन पार्टीला मंत्रिपद मिळेल का?
राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं. आता पुढच्या काही दिवसांत महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यामुळे कोणतं खातं कोणाला मिळतं? आणि कोणत्या पक्षाला किती खाते मिळतात? याकडे अनेकाचं लक्ष लागलं आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना रामदास आठवले म्हणाले, आम्हाला (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला) मंत्रिपद मिळतं की नाही हे माहिती नाही. त्यामुळे कोणत्याही खात्याचा विषयच नाही, अशी प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी दिली.
‘राज ठाकरेंची महायुतीत गरज काय?’
महायुतीत राज ठाकरे यांच्या सहभागाबद्दल बोलताना रामदास आठवले यांनी म्हटलं की, “राज ठाकरेंची हवा निवडणुकीत गेली आहे. राज ठाकरे विधानसभा निवडणुकीत माझ्याशिवाय सरकार येणार नाही अशा स्वप्नात होते. पण त्यांचं स्वप्न भंग झालं. राज ठाकरेंच्या सभा मोठ्या होतात. पण लोक फक्त त्यांच्या सभा ऐकायला येतात आणि निघून जातात, मतदान देत नाहीत. राज ठाकरे महायुतीत येतील असं वाटत नाही. पुढे काय निर्णय होणार? हे मला माहिती नाही. पण महायुतीत त्यांना घेण्यास फायदा नाही. मी महायुतीत असताना राज ठाकरेंची महायुतीत गरज काय?”, असं रामदास आठवले यांनी म्हटलं.