आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपचा जागा वाटपाबाबत चर्चा झाली आहे. त्यामध्ये आरपीआयला स्थान देण्यात आले नाही. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आम्हाला एकही जागा न सोडल्यास वेगळा विचार करावा लागेल असा इशारा आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शिवसेना-भाजपा युतीला दिला आहे. पुण्यात एका कार्यक्रमात ते बोलत होते.
शिवसेनेने दक्षिण तर भाजपने ईशान्य मुंबई जागेचा त्याग करावा, अशी मागणीही आठवलेंनी यावेळी बोलताना केली. आठवले म्हणाले की, शिवसेना भाजपची युती झाली आहे. ती समाधानाची आणि आनंदाची बाब आहे. पण आगामी निवडणुकीत आरपीआयला सोडून जागा जिंकणे अशक्य आहे. कारण आजअखेर आरपीआयच्या मदतीमुळे सेना भाजपाच्या जागा निवडून आल्या आहेत, हे दोन्ही पक्षांनी लक्षात ठेवावे. तसेच आमच्या विषयी कट करास्थान चालू आहे, असंही आठवले म्हणाले.
युती झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. मात्र त्यावेळी आरपीआयच्या कोणत्याही नेत्याला बोलावलं नाही. तर युतीचा निर्णय घेताना आरपीआयला जागा देखील सोडल्या नाहीत. त्यामुळे आरपीआयचा अपमान झाला असून या सर्व घडामोडी पाहता आम्हाला वार्यावर सोडता कामा नये. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आरपीआयला जागा न दिल्यास दुसरा विचार करावा लागेल, अशी भूमिका आठवलेंनी मांडली.
ते पुढे म्हणाले की,आगामी निवडणूकीच्या जागा संदर्भात रासप नेते महादेव जानकर यांच्या निवासस्थानी उद्या सायंकाळी सात वाजता बैठक होणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे आरपीआयला जागा मिळाव्यात अशी मागणी करणार आहे. जर आम्हाला जागा न मिळाल्यास दुसरा विचार करावा लागेल, अशी भूमिका त्यांनी मांडली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुलवामा हल्ल्या वरून सरकारला लक्ष केले आहे. त्या प्रश्नावर आठवले म्हणाले की, मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुलवामा घटनेबाबत विधाने किंवा शंका उपस्थित करणे योग्य नाही. आजपर्यंतच्या विधानांना प्रसिद्धी मिळत असल्याने ते असे विधान करतात. अशा शब्दात राज ठाकरे यांच्यावर आठवले यांनी निशाणा साधला. तसेच पुढे म्हणाले की, पाकिस्तानबरोबर युद्ध झाले पाहिजे. माझी महार बटालियन सीमेवर जाऊन लढायला तयार आहे. हार्टअटॅक येऊन मरण येण्यापेक्षा वीरमरण येणे कधीही चांगले असून युद्ध करून पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेतला पाहिजे. तसेच दहशतवादी अड्डे उध्वस्त केले पाहिजे. अशी भूमिका त्यांनी मांडली.
वंचित आघाडीचा फायदा भाजपला होणार : रामदास आठवले
माझी इच्छा आणि समाजाची इच्छा आहे की प्रकाश आंबेडकर यांनी एकत्र यावे, पण मात्र त्यांना ते मान्य नाही असं म्हणत आठवले यांनी आगामी निवडणुकीत वंचित आघाडीचा फायदा हा भाजपाला होणार असल्याचं सांगितलं.