गेल्या काही महिन्यांपासून राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. यासंदर्भात सरकारकडून अनेकदा लवकरच मंत्रीमंडळ विस्तार होईल असं सांगण्यात आलं असलं, तरी अद्याप त्याला मुहूर्त लागलेला नाही. त्यातच बच्चू कडू हे अपक्ष आमदार जाहीरपणे मंत्रीमंडळ विस्तार इतक्यात होणार नसल्याची भूमिका मांडत आहेत. त्यामुळे राज्य मंत्रीमंडळ विस्ताराबाबत कमालीची अनिश्चितता असताना रिपाइंचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात रिपाइंला स्थान मिळावं, अशी मागणी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रामदास आठवले यांनी नुकतीच जनसत्ताला एक मुलाखत दिली असून त्यामध्ये विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बाबतीत आपण समाधानी असल्याचं मत मांडलं आहे. “नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये अनुसूचित जाती-जमाती आणि ओबीसींचे अनेक मंत्री आहेत. मोदींनी सर्व वर्गांना न्याय देण्याचं काम केलं आहे”, असं म्हणत रामदास आठवलेंनी काँग्रेसप्रणीत यूपीए सरकारच्या काळातली आठवण सांगितली.

यूपीएच्या काळातली सांगितली आठवण

“मी एकदा अशी मागणी केली होती की जसं लोकसभेत आरक्षण आहे तसंच राज्यसभेत आणि मंत्रिमंडळातही आरक्षण असायला हवं. मी यूपीएमध्ये असताना मागणी केली होती की आम्हाला मंत्रीपद हवं. माझ्या पक्षाने देशभरात, महाराष्ट्रात काँग्रेसला पाठिंबा दिला. पण सत्ता आली तेव्हा मला त्यांनी सोडून दिलं. मला आश्वासन देऊन मंत्रीपद दिलं नाही. सोनिया गांधी म्हणाल्या शरद पवारांनी बनवायला हवं. शरद पवार म्हणाले सोनिया गांधींनी द्यायला हवं”, असं रामदास आठवले म्हणाले.

“महाराष्ट्रात आमचा प्रयत्न आहे की आता जो विस्तार होईल त्यात रिपाइंला एक मंत्रीपद आणि तालुका, जिल्हा, राज्य पातळीवरच्या महामंडळात आम्हाला हिस्सा मिळायला हवा. माझा पक्ष राष्ट्रीय पातळीवर असल्यामुळे भाजपाने आमच्याबद्दल विचार करायला हवा”, असं रामदास आठवले यावेळी म्हणाले.

उत्तर प्रदेशमध्ये पाठबळ देण्याची अपेक्षा

दरम्यान, यावेळी बोलताना रामदास आठवलेंनी उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षानं रिपाइंला पाठबळ दिलं पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. “उत्तर प्रदेशमध्ये मायावती सध्या प्रभावी नाहीत. तिथे मला बळ दिलं तर खूप सारे दलित, मुस्लीम माझ्याबरोबर येऊ शकतात. आजही ते माझ्याबरोबर येत आहेत. त्यामुळे माझा उपयोग करून भाजपानं आणखीन जास्त फायदा करून घेतला पाहिजे. उत्तर प्रदेशातला मुस्लीम थेट भाजपात जाऊ इच्छित नाही. पण रिपाइंमध्ये येऊन भाजपाला अप्रत्यक्ष पाठिंबा देऊ इच्छित आहे”, असं आठवले म्हणाले.

Video: रामदास आठवलेंना ‘या’ मतदारसंघातून लढवायचीये लोकसभा निवडणूक; म्हणाले, “मी देवेंद्र फडणवीसांना…!

“मुस्लिमांनाही सोबत घेण्याची गरज आहे. त्यामुळे भाजपा अधिक सामर्थ्यशाली होईल. त्यामुळे उत्तर प्रदेशच्या लोकसभा निवडणुकीत ३ ते ४ जागा रिपाइंला मिळाल्या, तर मुस्लीम, दलित समाज मोठ्या संख्येनं भाजपाला साथ देऊ शकतो. आम्ही याबाबत अमित शाह आणि नड्डांशी बोलणार आहोत”, असंही त्यांनी सांगितलं.