शिवसेना नेतेपदाचा राजीमाना दिल्यानंतर रामदास कदम यांच्यावर कठोर कारवाई करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कदम यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. कदम यांच्यासोबतच शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचीदेखील हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तसे आदेश दिल्याची माहिती शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाने दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मागील काही दिवसांपासून रामदास कदम पक्षनेतृत्वावर नराज होते. आपली ही नाराजी कदम यांनी आज उद्धव ठाकरे यांना पत्रामार्फत कळवत पक्षनेतेपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. या पत्रात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अनेक आरोप केले. “शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी माझी शिवसेना नेतेपदी नियुक्त केली होती. मात्र, शिवसेना प्रमुखांचे निधन झाल्यानंतर नेतेपदाला कुठलीही किंमत राहिली नाही, हे मला पहायला मिळालं,” अशी खदखद रामदास कदम यांनी बोलून दाखवली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी रामदास कदम यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला.

आनंद अडसूळ यांचीही हकालपट्टी

शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचीदेखील शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. अडसूळ यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर अडसूळ शिंदे गटात सामील होण्याची शक्यता वर्तविली जात होती. तसे संकेत अडसूळ यांचे पुत्र अभिजित अडसूळ यांनी दिले होते. “गेल्या कित्येक वर्षांपासून एकनाथ शिंदे जेव्हा मंत्री होते, तेव्हा मी हक्काने त्यांच्याकडे जायचो. अगदी रात्री २ वाजता देखील त्यांच्याकडे गेलो, तरी त्यांचे दरवाजे उघडे असायचे. त्यामुळे गट-तट मी मानले नाहीत. मी शिवसैनिक आहे. एकनाथ शिंदे दाखवतील, त्या दिशेने चालणारा मी शिवसेना कार्यकर्ता आहे,” असे अभिजित अडसूळ यावेळी म्हणाले होते. त्यामुळे आनंदराव अडसूळ यांनी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचे आज आदेश दिले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ramdas kadam and anandrao adsul removed from shivsena ordered uddhav thackeray prd