शिवसेना (शिंदे गट) नेते आणि माजी आमदार रामदास कदम हे सातत्याने शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करत आहेत. कदम यांनी आज पुन्हा एकदा संजय राऊत यांच्यासह उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. कदम हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी माध्यमांशी बातचित केली. तसेच विरोधकांच्या अयोध्या दौऱ्यावरून सुरू असलेल्या टीकेला उत्तरं दिली.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि खासदार संजय राऊत हे एकनाथ शिंदेंच्या अयोध्या दौऱ्याला पब्लिसिटी स्टंट म्हणाले होते, त्यावर कदम यांनी प्रत्युत्तर दिलं. कदम म्हणाले की, अयोध्येला आम्ही का जाऊ नये, आम्ही श्रीरामाचं दर्शन घेणं हा पब्लिसिटी स्टंट कसा काय? मुळात अयोध्येत जाऊन दर्शन घेणं पाप आहे का? अनेक वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेत सत्ता असताना कमिशन खाऊन ज्यांनी पापं केली ती पापं धुण्यासाठी आम्ही अयोध्येला जात नाही. ती पापं धुण्यासाठी तुम्ही अयोध्येला जायला हवं.
राऊत साहेब तुमचं नशीब फुटकं आहे : रामदास कदम
रामदास कदम म्हणाले की, ते आमच्या दौऱ्याला पब्लिसिटी स्टंट म्हणत आहेत. अयोध्येतल्या बॅनर्सवर बोलत आहेत. परंतु ते बॅनर आम्ही लावलेले नाहीत. ते बॅनर तिथल्या लोकांनी लावले आहेत. ही गोष्ट सर्वांच्या नशिबात नसते. राऊत साहेब तुमचं नशीब फुटकं आहे.
हे ही वाचा >> “अजित पवार नॉट रिचेबल?” विरोधी पक्षनेत्यांनी पत्रकारांना सुनावलं, म्हणाले, “बंद करा ते”
रामदास कदम म्हणाले की, काश्मीरमधलं ३७० कलम हटवावं आणि अयोध्येत भव्य राम मंदिर बांधावं हे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं. ते स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केलं. आम्हाला त्या गोष्टीचा अभिमान आहे. आता तिथे राम मंदिर बांधलं जात आहे, त्यामुळे तिथे प्रभू श्रीरामासमोर नतमस्तक होण्यासाठी आम्ही अयोध्येला जात आहोत.