शिवसेना कोणाची यावरून शिंदे गट आणि ठाकरे गटात जोरदार संघर्ष सुरू आहे. आज शिवसेनेचं धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह कोणाचं या प्रकरणावर निवडणूक आयोगासमोर सुनावणी होत आहे. शिंदे आणि ठाकरे गटाने आपआपली बाजू मांडल्यानंतर आयोग आपला निर्णय देईल. मात्र, निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतल्यास काय? यावर शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी प्रतिक्रिया दिली. “यांना माहिती नाही की, निवडणूक आयोग पक्षचिन्हाचा निर्णय घेताना एक आमदार निवडून यायला तीन तीन लाख मतदान असते आणि एक खासदार निवडून आणण्यासाठी २० लाखांचं मतदान असतं याचाही विचार करेल,” असं मत रामदास कदम यांनी व्यक्त केलं. ते शुक्रवारी (७ ऑक्टोबर) एबीपी माझाशी बोलत होते.
रामदास कदम म्हणाले, “निवडणूक आयोग जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य असेल, आम्ही त्याचं स्वागत करू. तसेच एकत्र बसून पुढील निर्णय घेऊ. मात्र, आम्हाला १०० टक्के विश्वास आहे की, धनुष्यबाण निश्चितपणे आम्हाला मिळेल. पूर्ण बहुमत आमच्याकडेच आहे.”
“यांना अजून याची कल्पना नाही, यांना माहिती नाही”
“एक आमदार निवडून यायला तीन तीन लाख मतदान असते. एक खासदार निवडून आणण्यासाठी २० लाखांचं मतदान असतं. यांना अजून याची कल्पना नाही, यांना माहिती नाही की, हे सर्व यात गृहित धरलं जाईल,” असं मत रामदास कदम यांनी व्यक्त केलं.
“लोकशाहीत ज्याच्याकडे अधिक संख्या त्यांना अधिक महत्त्व”
पक्षातील बहुमतावर बोलताना रामदास कदम म्हणाले, “याआधीचे निवडणूक आयोगाचे निकाल पाहिले तर ज्याच्याकडे आमदार, खासदार, नगरसेवक, सभापती बहुमत आहे त्यांच्याच बाजूने निकाल येतो. दसरा मेळाव्याला शिवाजी पार्क आणि बीकेसी येथेही अधिक ताकद कुणाकडे आहे हे सिद्ध झालंय. लोकशाहीत ज्याच्याकडे अधिक संख्या त्यांना अधिक महत्त्व दिलं जातं.”
“कुठल्याही परिस्थितीत धनुष्यबाण आम्हालाच मिळेल”
“आमची शिवसेना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची असल्यामुळे कुठल्याही परिस्थितीत धनुष्यबाण आम्हालाच मिळेल. दूध का दूध आणि पाणी का पाणी व्हायला वेळ लागणार नाही. यावर आजच निर्णय होईल,” असंही कदमांनी नमूद केलं.